बेकायदेशीर जाहिरतबाजीवर महापालिकेची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदेशीर जाहिरतबाजीवर महापालिकेची कारवाई
बेकायदेशीर जाहिरतबाजीवर महापालिकेची कारवाई

बेकायदेशीर जाहिरतबाजीवर महापालिकेची कारवाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ९: पूर्वपरवानगी न घेता जाहिरात करणाऱ्यांवर महापालिकेतर्फे कडक कारवाई करण्याचा इशारा पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिला आहे. विना परवानगी जाहिरातबाजी करणाऱ्या तीन जणांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. पालिकेच्या कारवाईनंतर खारघरमधील गावांबाहेर लावलेल्या बेकायदा होर्डिंगधारकांवर कधी कारवाई करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
अनेकदा खासगी संस्था, कंपन्या, विविध क्लासेस आपली जाहिरात करण्यासाठी महापालिकेची पूर्व परवानगी न घेता सार्वजनिक मालमत्तांचा वापर करीत असतात. अशा प्रकारे जाहिरातीचे फलक, भित्तीपत्रके लावून शहर विद्रूप करणाऱ्या जाहिरात करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी पनवेल महापालिकेने तीन जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केला आहे.
पनवेल शहर आणि नवीन पनवेल भागात आयसीआयसीआय बँकेशी संबंधित एका कंपनीने बेकायदा जाहिरातबाजी केली होती तसेच प्रहार ॲकॅडमी सेंटर आणि कमांडो ॲकॅडमी सेंटर यांनी पोलिस भरती प्रशिक्षणाची जाहिरात केली होती. या संस्थांनी जाहिरात करताना महापालिकेची परवानगी घेतली नसल्‍याने पनवेल शहर पोलिस ठाण्यात ''ड'' प्रभागाचे प्रभाग अधिकारी अमर पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

परवानगीनंतर जाहिरात करा
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील पनवेल शहर, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर या भागात कोणत्याही संस्थेला वा इतर कोणत्याही आस्थापनेला जाहिरात करायची असेल तर पालिकेच्या मुख्यालयाशी अथवा प्रभाग कार्यालयाशी संपर्क साधून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असते. अशा प्रकारे पूर्वपरवानगी न घेता भित्तीपत्रके लावल्‍यास अथवा जाहिरात केल्‍यास ‘मालमत्ता विद्रूपीकरण कायदा १९९५’ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.
- कैलास गावडे, उपायुक्‍त, पनवेल महापालिका

खारघरमध्येही कारवाईची मागणी
खारघर नोडमधील इनामपुरी, ओवे गाव या भागात काही स्थानिक राजकीय लोकांकडून पालिका क्षेत्रातील मोकळ्या जागेत बेकायदा होर्डिंग्ज उभारले आहेत. या होर्डिंग्जवर दर सणासुदीच्या आणि राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे जाहिरात लावले जाते. अशा होर्डिंगवर पालिकेतर्फे का कारवाई केली जात नाही, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.