आर्थररोडबाहेर शिवसैनिकांचा आनंदोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्थररोडबाहेर शिवसैनिकांचा आनंदोत्सव
आर्थररोडबाहेर शिवसैनिकांचा आनंदोत्सव

आर्थररोडबाहेर शिवसैनिकांचा आनंदोत्सव

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ९ : पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात खासदार संजय राऊत यांना बुधवारी विशेष पीएमएलए न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. तब्बल १०२ दिवसांनी तुरुंगातून बाहेर आलेल्या राऊत यांचे आर्थर रोड कारागृहाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. बुधवारी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी राऊत भगवा मफलर परिधान करून कारागृहाबाहेर पडले. या वेळी राऊत यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘लढवय्या योद्धा’ अशा आशयाचे फलक नजीकच्या परिसरात लावण्यात आले होते.

खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्याचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी कारागृह परिसरात एकच गर्दी केली होती. त्यामुळे कारागृह परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. या वेळी महिला पोलिसही तैनात ठेवण्यात आल्या होत्या. राऊत कारागृहाच्या बाहेर पडताच ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळून, हार घालून राऊत यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजीही केली.

राऊत थकलेले वाटत होते; मात्र सुटकेचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, राऊत साहेब तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणांनी परिसर गजबजून गेला. राऊत बाहेर पडल्यानंतर त्यांना प्रसारमाध्यमांनी गराडा घातला होता. एरव्ही प्रसार माध्यमांपुढे कायम रोखठोक मते मांडणाऱ्या राऊत यांनी फार बोलणे टाळत मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. प्रकृती अस्वस्थतेमुळे फार बोलता येणार नाही; मात्र लवकरच पत्रकार परिषद घेऊन मी सविस्तर बोलेन, असे त्यांनी सांगितले.

...तोच थाट कायम
खासदार संजय राऊत यांनी अटकेच्या वेळी मूठ बांधून ‘मी झुकणार नाही’ हा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी भगवा गमछा हवेत भिरकावला होता. सुटकेच्या वेळीदेखील राऊत यांनी भगवा गमछा हवेत उडवला. मिरवणूक सुरू असताना शिवसैनिकांचे फूल, हार स्वीकारत होते. मध्येच ते संवादही साधताना दिसले. कारागृहातून सुटल्याचा मला आनंद वाटत आहे. माझा न्यायालयावरील विश्वास वाढला असून, आपली लढाई सुरूच राहणार असल्याचे राऊत म्हणाले.