तुंदुरूस्‍त शरीरासाठी सुका मेवा लाभदायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुंदुरूस्‍त शरीरासाठी सुका मेवा लाभदायक
तुंदुरूस्‍त शरीरासाठी सुका मेवा लाभदायक

तुंदुरूस्‍त शरीरासाठी सुका मेवा लाभदायक

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १० (बातमीदार) : परतीच्‍या पाऊस गेल्‍यानंतर आता गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. अशा वातावरणात शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी थंडीमध्ये सुका मेवा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. सूक्ष्म पोषक तत्त्वे असलेल्‍या सुका मेव्‍याचे सेवन केल्याने शरीराला थंडीपासून बचाव मिळतो. थंडीच्या दिवसात पौष्टिक वस्तू खाव्यात, असा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. या दिवसांमध्ये साजूक तुपातील सुका मेव्याचे लाडू करून ते पहाटे किंवा सकाळी उठून खाण्याची पद्धत अनेक ठिकाणी आहे. गेल्‍या काही दिवसांत बाजारात सुका मेव्‍याच्‍या दुकानांत प्रचंड गर्दी वाढली आहे.
हिवाळ्यामुळे बाजारात विविध प्रकारचे डिंकाचे, मेथीचे, मिक्स ड्रायफ्रूट लाडू, तसेच बदाम, काजू, किसमिस, खजूर, खारिक, खोबरे, मनुके उपलब्ध झाले आहेत. मागील आठवड्यापासून सुका मेवा आणि पौष्टिक लाडूंना मागणी वाढली आहे. थंडीमध्ये सुका मेवा खाल्‍ल्याने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते, प्रतिकारशक्तीमध्ये वाढ होते. काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, मनुका हे पाण्यात भिजवून खाल्याने शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतात. गेल्या काही दिवसांपासून मेथीबरोबरच उडदाच्या लाडूंना बाजारात मोठी मागणी येत आहे.
प्रकृतीसाठी लाभदायक
सुका मेव्‍यामध्ये फायबर, कॅलरी भरपूर प्रमाणात असल्याने हिवाळ्यात प्रकृतीसाठी ते पोषक ठरतात. यामध्ये असलेले प्रोटिन, फायबर, फॉलीक ॲसिड, व्हिटॅमिन, मिनरल्स यांसारखे घटक मोठ्या प्रमाणात असतात. काजू, बदाम, पिस्ता, मनुका, अक्रोड, खजूर, अंजिर यांसारखा सुका मेवा अधिक प्रमाणांत खाल्‍ला जातो. थंडीपासून सामना करण्यासाठी तसेच शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी सुक्‍या मेव्‍याचे सेवन उपयोगी ठरते.
पौष्टिक लाडूंची खरेदी
सुका मेव्याचेच भाव जास्त असल्याने रेडिमेड लाडू खरेदीकडेसुद्धा मोठी मागणी असते. तसेच गृहिणींकडून या सुका मेव्याची खरेदी करून घरीच लाडू तयार करण्यास पसंती दिली जाते. हिवाळा आरोग्यदायी ऋतू असल्यामुळे घरोघरी पौष्टिक लाडू बनवले जात आहेत.
----------------------------------
कोट
सुक्‍या मेव्‍याची किंमत कमी झाल्याने आणि थंडीला सुरुवात झाल्याने ग्राहकांकडून सुका मेवा खरेदी करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच काळ्या मनुकांना सर्वाधिक मागणी असून, बदामालासुद्धा मोठी मागणी आहे.
- विवेक कुमार, विक्रेता
------------------------------------------------------
दर (प्रतिकिलो रुपयांमध्‍ये)
बदाम - ४०० ते १२००
पिस्ता- ४०० ते १६००
मेथी व डिंक लाडू - ५०० ते १२००
सुक्या मेव्याचे मिक्स लाडू- ८०० ते १३००
अंजिर -१८००
किसमिस- १५० ते ७००
मनुके-१५० ते ६००
खारिक -१०० ते ४००