अनधिकृत बांधकामांना पिण्याचे पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत बांधकामांना पिण्याचे पाणी
अनधिकृत बांधकामांना पिण्याचे पाणी

अनधिकृत बांधकामांना पिण्याचे पाणी

sakal_logo
By

वाशी, ता. १० (बातमीदार) ः शहरात करदात्या नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा करण्यात येतो, मात्र बेकायदा उभ्या राहत असलेल्या चाळी, दुमजली घरांच्या बांधकामाला तसेच गावठाणमधील अनधिकृत इमारतींना मुबलक पाणीपुरवठा होत आहे. नवी मुंबई महापालिकेकडून अनधिकृतपणे पाणी वापरणाऱ्या नळजोडण्या निष्कासित करण्याचा दिखावा करण्यात येत असला तरी नागरिकांना मात्र अनियमित पाणीपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागतो.
नवी मुंबई महापालिका क्षेत्राची लोकसंख्या जवळपास १६ लाखांच्या घरात आहे. एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या बांधण्यात आल्‍या आहे. तसेच घराचे भाव गगनाला भिडल्याने व भाड्याचे दरही वाढत असल्याने झोपडपट्टीमधील रहिवाशांनी घर भाड्याने देण्याचा तसेच गरजेपोटी दुमजली घर बांधण्याचा सपाटा लावला आहे. या अनधिकृत बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरले जात आहे. याप्रकरणी कारवाईकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्‍याची नागरिकांची तक्रार आहे.
एमआयडीसी, गावठाण, सिडको या भागात बांधण्यात येणाऱ्या चाळी, इमारती, घरांच्या डागडुजीसाठीही बिनधास्तपणे पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाकडे अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी प्राप्त होताच संबंधित अधिकारी जलवाहिनीवर करण्यात आलेली जोडणी तोडण्याचे कारवाई करतात, मात्र पुन्हा परिस्‍थिती जैसे थे होते.
पाणी वितरणात असमानता असून अनधिकृत नळजोडण्या मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप अनेकदा लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत असला तरी त्‍यावर ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. एमआयडीसीच्या बारवी व महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो. यंदा मोरबे धरण काठोकाठ भरले आहे. त्‍यामुळे सप्टेंबर-ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र बेकायदा बांधकामांसाठी पिण्याचे पाणी असेच वापरल्‍यास, उन्हाळ्‌यात पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

बांधकामांना पाणी वापरण्यासाठी बेकायदेशीरपणे मोटारीने पाणी वापरण्यात येते. त्यामुळे काही भागांत कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

अनधिकृत बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करत होत असल्यास महापालिकेकडून कारवाई करण्यात येते. तसेच बेकायदेशीरपणे पाण्याचे पंप लावत असतील तर त्याच्यावर पंप जप्तीची कारवाई करण्यात येते.
- संजय देसाई, शहर अभियंता,