शिधापत्रीका कार्यालयात दलालांचा वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिधापत्रीका कार्यालयात दलालांचा वावर
शिधापत्रीका कार्यालयात दलालांचा वावर

शिधापत्रीका कार्यालयात दलालांचा वावर

sakal_logo
By

भांडुप, ता. १० (बातमीदार) ः भांडुप पश्चिमेला असलेल्या शिधापत्रिका कार्यालयात दलालांचा वावर वाढला आहे. कार्यालयातील कागदपत्रेही हे दलाल हाताळताना दिसत असल्याचा आरोप रिपाइंचे तालुका अध्‍यक्ष पवन कुमार बोरुडे यांनी केला असून त्‍यांच्‍यावर कारवाई करण्याची मागणीही त्‍यांनी केली आहे.
शिधापत्रिकांबाबतचे काम गतीने होण्यासाठी नागरिकांना दलालांचा सहारा घ्यावा लागत आहे. पर्यायाने सर्वसामान्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत पुरवठा विभागाच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याचे वितरण केले जात आहे. यासाठी नागरिकांना विविध योजनांतर्गत शिधापत्रिका देण्यात आल्या आहेत. नवीन शिधापत्रिका तयार करण्यासाठी भांडुप परिसरातील नागरिकांची शिधापत्रिका कार्यालयात गर्दी होत आहे. तसेच शिधापत्रिकेत बदल करणे, नाव चढविणे, नाव कमी करणे, जीर्ण शिधापत्रिका बदलणे अशी कामे करण्यासाठी कार्यालयात गर्दी असते. याचाच फायदा घेऊन काही जण कर्मचारी व नागरिकांमधील मध्यस्थ म्हणून काम करत असल्‍याचा आरोप बोरुडे यांनी केला आहे. अशा दलालांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने शिधावाटप नियंत्रक व संचालक मुंबई यांच्याकडे लेखी निवेदन देत दलालांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिधावाटप कार्यालयात दलालांचा वावर वाढला आहे. यामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. याबाबत प्रशासनाने कडक कारवाई करावी.
– पवन कुमार बोरुडे, भांडुप तालुकाध्यक्ष, रिपाइं

दलालां‍बाबत माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल. असा काही प्रकार कोणाच्या निदर्शनास आल्यास कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.
– प्राची पंडित, शिधावाटप अधिकारी