शालेय जीवनात स्वरक्षणाचे धडे गिरवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय जीवनात स्वरक्षणाचे धडे गिरवा
शालेय जीवनात स्वरक्षणाचे धडे गिरवा

शालेय जीवनात स्वरक्षणाचे धडे गिरवा

sakal_logo
By

वसई, ता. १० (बातमीदार) : अभ्यास करताना विद्यार्थिनींनी कराटे, व्यायामाकडेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जात स्वतःचा बचाव करण्यासाठी बळ मिळते. त्यामुळे स्वरक्षणाचे धडे शालेय जीवनात गिरवल्यास आजच्या युगात मोकळेपणाने जगता येईल, असे प्रतिपादन वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी तलासरी येथे केले.
पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जनसंवाद व महिला समुपदेश मेळाव्याचे आयोजन तलासरी येथील पोलिस मैदानावर करण्यात आले होते. या वेळी हेमांगिनी पाटील बोलत होत्या. या कार्यक्रमाला ठक्कर बाबा कॉलेज, कॉ. गोदावरी शामराव परुळेकर कॉलेज, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय माध्यमिक कन्या शाळा, आश्रमशाळा, महिला मंडळ बचत गट, दयानंद हॉस्पिटल कॉलेज, महिला दक्षता कमिटीमधील एकूण १८०० महिलांनी सहभाग घेतला होता. पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, आमदार विनोद निकोले, श्रीनिवास वनगा, हेमांगिनी पाटील, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा राजकन्या आढोळे, माजी अध्यक्षा शारदा शिंदे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विनोद राठोड, तहसीलदार श्रीधर गालीपेल्ली, पोलिस निरीक्षक अजय वसावे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
----------------------
विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन
महिलांविषयी कायदे, बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार, पोस्को कायदा, महिलांवरील अत्याचार, याबाबत बाल कल्याण समिती माजी अध्यक्षा शारदा शिंदे यांनी माहिती दिली. तसेच सायबर गुन्हे, करियर मार्गदर्शन, महिला सुरक्षा व कौशल्य विकास यासंबंधी पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
----------------------
पोलिसांचे जनसंवाद अभियान
पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेशी सुसंवाद व समन्वय राहावा, प्रत्येक गावात शांतता व सुरक्षितता अबाधित असावी म्हणून पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जनसंवाद अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळत आहे.
---------------------
तलासरी : उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.