शैक्षणिक भुखंडाचे आरक्षण बदलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शैक्षणिक भुखंडाचे आरक्षण बदलले
शैक्षणिक भुखंडाचे आरक्षण बदलले

शैक्षणिक भुखंडाचे आरक्षण बदलले

sakal_logo
By

भाईंदर, ता. १० (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरातील महापालिकेच्या ताब्यात आलेल्या शैक्षणिक भूखंडांचे आरक्षण नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप विकास आराखड्यात बदलले आहे. परिणामी, हे भूखंड खासगी शैक्षणिक संस्थांना शाळा बांधण्यासाठी लीजवर देण्याची प्रक्रिया अडचणीत आली आहे.
महापालिकेच्या आधीच्या विकास आराखड्यात अनेक खासगी भूखंडांवर प्राथमिक व माध्यमिक शाळांचे आरक्षण आहे. यातील काही भूखंड महापालिकेच्या ताब्यात आले आहेत. महापालिकेच्या ताब्यात आलेले अनेक आरक्षणाचे भूखंड विकसित न झाल्यामुळे त्यावर अतिक्रमण होण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवर त्यापैकी जे भूखंड एकूण आरक्षणाच्या ५० टक्क्यांहून अधिक किंवा दोन हजार चौ. मीटरपेक्षा जास्त आहेत, तसेच जे भूखंड महापालिकेच्या शाळा बांधण्यासाठी नको आहेत, असे भूखंड खासगीकरणातून विकसित करण्याचा निर्णय आयुक्त दिलीप ढोले यांनी नुकताच घेतला आहे. हे भूखंड खासगी शैक्षणिक संस्थांना शाळा बांधण्यासाठी ३० वर्षांच्या कालावधीसाठी भाडे तत्त्वावर देण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या आधीच्या विकास आराखड्याची मुदत संपुष्टात आल्याने नव्याने विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्याने काही दिवसांपूर्वीच त्याचा प्रारूप आराखडा नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यासाठी प्रसिद्ध झाला आहे. या प्रारूप आराखड्यात महापालिकेने निविदा प्रसिद्ध केलेल्या शैक्षणिक भूखंडाचे आरक्षण बदलण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भूखंडांवर शैक्षणिक आरक्षणाऐवजी वृद्धाश्रम, अग्निशमन केंद्र, बेघरांना घरे, शासकीय वापर अशा प्रकराची आरक्षणे नव्या प्रारूप विकास आराखड्यात प्रस्तावित आहेत. या भूखंडांची मूळची आरक्षणेच बदलली असल्यामुळे ते खासगी संस्थांना देण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेली प्रक्रियाच अडचणीत आली आहे. त्यामुळे आता प्रारूप विकास आराखडा अंतिम होईपर्यंत प्रक्रिया स्थगित करावी लागणार आहे.
....
तांत्रिक अडचण
महापालिकेच्या ताब्यात असलेल्या दहा भूखंडांपैकी सहा भूखंड प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान व चार भूखंड माध्यमिक शाळा व खेळाचे मैदान यासाठी राखीव आहेत. हे भूखंड शैक्षणिक संस्थांना देण्यासाठी महापालिकेने निविदादेखील प्रसिद्ध केली आहे, परंतु नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या विकास आराखड्यात या शैक्षणिक भूखंडांचे आरक्षणच बदलल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.
......
प्रारूप विकास आराखड्यात शैक्षणिक भूखंडाच्या आरक्षणात बदल झाला आहे. ही बाब तपासून पुढील कार्यवाहीसंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल.
- दिलीप ढोले, आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका