ठाणे जिल्ह्यात सात महिन्यांत ९३ जणांना सर्पदंश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

snake bite
जिल्ह्यात सात महिन्यांत ९३ जणांना सर्पदंश

ठाणे जिल्ह्यात सात महिन्यांत ९३ जणांना सर्पदंश

ठाणे - जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी सर्पदंशाच्या घटना घडत असतात. एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या सात महिन्यांच्या कालावधीत ९३ जणांना सर्पदंशाचा फटका बसला आहे. सर्पाने दंश केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

जिल्‍ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांतील ग्रामीण भागांसह शहरी भागात उन्हाळ्यात जमीन अधिकच तापत असल्यामुळे जमिनीवर सरपटणारे व जमिनीखाली राहणारे प्राणी थंड जागा शोधण्यासाठी बिळाबाहेर पडत असतात. या सरपटणाऱ्या प्राण्यांचा माणसांशी संपर्क आल्यास ते दंश करीत असतात. दुसरीकडे पावसाळ्याच्या कालावधीतदेखील जमिनीवर साठणाऱ्या पाण्यामुळे सरपटणारे प्राणी सुरक्षित जागेच्या शोधासाठी बिळांच्या बाहेर पडत असतात. त्यात ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी सर्पदंशाच्या घटना घडत असतात. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या सात महिन्यांच्या कालावधीत ९३ जणांना सर्पदंशाच्या घटना घडल्या असून एकाचा मृत्यू झाला असल्याची नोंद ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्प व विंचूदंशावर उपचार करण्यासाठी पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सर्पदंशासारखी घटना घडल्यास त्यास वेळेवर व आवश्यक औषधोपचार मिळून प्राण वाचविता येणार आहे.

- सुभाष पवार, मुख्य औषध निर्माता

अवघ्या दोन विंचू दंशाच्या घटना

जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाळ्यात जमिनीत पसरणाऱ्या ओलाव्यामुळे, उन्हाळ्याच्या काळात जमीन तापत असल्याने थंडावा शोधण्यासाठी बिळातून विंचू बाहेर पडत असतात. त्यात रात्रीच्या वेळी काळोखात ते नागरिकांना लक्ष्‍य करतात. मागील सात महिन्यांत दोन जणांना विंचवांनी दंश केला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.

महिने सर्पदंश विंचुदंश

एप्रिल ०० ००

मे ०५ ०१

जून ११ ००

जुलै २९ ००

ऑगस्ट १२ ००

सप्टेंबर १७ ०१

ऑक्टोबर १९ ००

सर्पदंश व विंचुदंश याबाबत शासकीय रुग्णालयात पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे. येथे उपचारार्थ येणाऱ्यांवर वेळीच उपचार करण्यात येत असतात. त्यामुळे रुग्णाला वेळेत उपचार मिळून प्राण वाचविण्यात येत असतात.

- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

टॅग्स :Thanesnake