शासकीय अनुदानातून अवजारे खरेदीसाठी नामी संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय अनुदानातून अवजारे खरेदीसाठी नामी संधी
शासकीय अनुदानातून अवजारे खरेदीसाठी नामी संधी

शासकीय अनुदानातून अवजारे खरेदीसाठी नामी संधी

sakal_logo
By

जव्हार, ता. १० (बातमीदार) : जव्हारसारख्या ग्रामीण, आदिवासी आणि डोंगराळ प्रदेशात केवळ खरिपात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. या वेळी मजुरांची उपलब्धता आणि निसर्गाचा लहरीपणा या बाबींचे व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असते. अशा परिस्थितीत राज्य शासनाच्या महा डीबीटी योजनेंतर्गत शासकीय अनुदानातून ट्रॅक्टर तथा शेतीची यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे.
तालुक्यातील मजूर टंचाईमुळे मागील काही वर्षांमध्ये शेतकरी यांत्रिकीकरणाकडे मोठ्या प्रमाणात वळाल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या वेळेची व पैशांची बचत व्हावी म्हणून शेतकामासाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जात आहे. आता ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. याकरिता लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.


अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी अनुदान
या योजनेंतर्गत महिला, अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती/ जमातीसाठी किमतीच्या ५० टक्के अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. योजनेतून कृषी यंत्र, अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसाह्य देण्यात येते. यात ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, पॉवर टिलर चलित अवजारे, बेल चलित यंत्र, अवजारे, मनुष्य चलित यंत्र, अवजारे, प्रक्रिया संच, काढणी पश्चात तंत्रज्ञान, फलोत्पादन यंत्र अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे, स्वयंचलित यंत्रे.

नियम व अटी
लाभार्थीला एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील. म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्रअवजार यापैकी एक अवजार मंजूर केले जाते. ट्रॅक्टर असल्यास अवजारांसाठी अर्ज करता येईल. या वेळी ट्रॅक्टर असल्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. लाभ घेतलेल्या घटकासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही; परंतु अवजारासाठी अर्ज करता येईल.


शासनाच्या महा डीबीटी योजनेंतर्गत जव्हार तालुक्यातील शेती व्यवसायाकरिता यांत्रिकीकरणाची जोड देण्यासाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावा. लहान-मोठे ट्रॅक्टर, पॉवर टिलर, गवत कापणी यंत्र, भात कापणी यंत्र, विद्युतमोटार, औषधे फवरणी पंप, शेत तळे अस्तरीकरण या विविध प्रकारच्या बाबी अनुदानसहित घेणे फायद्याचे ठरू शकते.
- वसंत नागरे, तालुका कृषी अधिकारी, जव्हार