बहुउद्देशीय कामगारांचे आरोग्य रामभरोसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहुउद्देशीय कामगारांचे आरोग्य रामभरोसे
बहुउद्देशीय कामगारांचे आरोग्य रामभरोसे

बहुउद्देशीय कामगारांचे आरोग्य रामभरोसे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० ः महापालिकेच्या विविध विभागांमध्ये भरती केलेल्या बहुतांश कंत्राटी बहुउद्देशिय कामगारांचे विमा (ईएसआयसी) काढला जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. महापालिकेच्या नेरूळ रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर बदलण्यासाठी गेलेल्या कामगाराचा अपघात झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या कामगाराचा विमा कार्ड कंत्राटदाराने न दिल्याची बाब समोर आली. नियमानुसार कामगार विमा काढला नसल्यास संबंधित कंत्राटदाराला महापालिकेतर्फे देयके अदा करता येत नाही. परंतु महापालिका प्रशासनाकडून विमा काढलेला नसला, तरी सुद्धा कंत्राटदारांच्या बँक खात्यावर देयके अदा केली जात आहेत.
नवी मुंबई महापालिकेचा बराचसा कारभार कंत्राटी स्वरुपातील कामगार आणि ठोक मानधनावर भरलेल्या कामगारांकडून केला जातो. महापालिकेच्या आरोग्य, साफ-सफाई, शिक्षण, मालमत्ता विभाग आदी विभागात कंत्राटी स्वरूपात बहुद्देशीय कामगार काम करतात. या कामगारांना किमान वेतनानुसार पगार अदा केला जातो. मात्र त्यांचा पगार कंत्राटदारामार्फत अदा केला जातो. कंत्राटदाराकडून संबंधित कामगाराला विमा, भविष्यनिर्वाह निधी आदी सुविधा देण्याची जबाबदारी पालिकेने दिली आहे. कंत्राटदाराला कामात काही अपघात झाल्यास तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी हा कामगार विमा उपयोगात येतो. मात्र बहुतांश कंत्राटदारांनी त्यांच्या बहुउद्देशीय कामगारांचे विमा काढलेले नाहीत. फक्त कागदपत्रे घेऊन स्वतः जवळ ठेवलेली आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागात सर्वाधिक बहुउद्देशीय कामगार कामाला असून रुग्णालयातील स्वच्छतेसह इतर कामे करून घेतली जातात.
-----------------------------------
तंत्रज्ञांऐवजी बहुउद्देशीय कामगारांचा वापर
महापालिकेच्या बेलापूर, नेरुळ, ऐरोली आणि वाशी या मुख्य रुग्णालयांमध्ये ४५० पेक्षा जास्त बहुउद्देशीय कामगार काम करतात. या कामगारांकडून स्वच्छतेची कामे करून घेणे अपेक्षित आहे. परंतु रुग्णालयातील रुग्णांचे जखमेवरील मलमपट्टी करणे, व्हेंटिलेटर बदलणे, सलाईन लावणे, रुग्णाची उचल ठेव करणे, अतिदक्षता विभागातील तांत्रिक कामे करणे आदी कामे या बहुउद्देशीय कामगारांकडून करून घेतली जातात. बऱ्याचदा काम करणारा कामगार कुशल असल्यास अपघात होत नाही. मात्र एखाद्या अकुशल कामगाराला असे काम करायला दिल्यास अपघात होऊन उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. याचे गांभीर्य अद्याप नवी मुंबई महापालिकेला आलेले नाही.
-----------------------------
अशी घडली घटना
६ नोव्हेंबरला दुपारी १२ च्या सुमारास नेरूळ रुग्णालयातील अतिदक्षता रूम आणि शस्त्रक्रिया विभागातील ऑक्सिजन संपला होता. कर्तव्यावर असणारा कामगार सखाराम मोरे ऑक्सिजन चढवण्यासाठी गेले होते. ज्या ठिकाणाहून ऑक्सिजन सिलिंडर वाहिन्यात चढवण्यात येतो. त्या वाहिन्यांना चार सिलिंडर सखाराम यांनी जोडले. परंतु पाचवा सिलिंडर जोडून सुरु करण्यासाठी व्हॉल्‍व उघडताच एक सिलिंडर थेट सखाराम यांच्या अंगावर उडाला. यातील उच्च दाबाच्या ऑक्सिजनमुळे सखाराम यांचा निम्‍मा चेहरा होरपळला. सखाराम यांच्यावर नेरूळ रुग्णालयात दोन दिवस उपचार केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
------------------------------
महापालिका प्रशासनातर्फे संबंधित कामगारांना सर्व सुविधा देणे अपेक्षित आहे. परंतु बहुउद्देशीय कामगारांचे कामगार विमा काढला जात नसल्याबाबतची चौकशी करून कारवाई करता येईल.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
---------------------------------
जैव वैद्यकीय अभियंते भरा
बहुउद्देशीय कामगारांना तांत्रिक कामाचा अनुभव नसताना प्रशासनातर्फे सिलिंडर बदलण्यासारखी तांत्रिक कामे का दिली जातात. अशा कामगारांचे विमा काढलेला नसताना त्यांच्या जीविताला हानी पोचली असती तर कोण जबाबदार राहील असता, महापालिकेने बहुउद्देशीय कामगारांकडून कामे करून घेण्यापेक्षा ठाणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर जैव वैद्यकीय अभियंता व साहायक वैद्यकीय अभियंता यांची भरती करावी अशी मागणी काँग्रेस इंटक नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिकेकडे केली आहे.