आईस फॅक्टरी रस्ता लवकरच पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आईस फॅक्टरी रस्ता लवकरच पूर्ण
आईस फॅक्टरी रस्ता लवकरच पूर्ण

आईस फॅक्टरी रस्ता लवकरच पूर्ण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : एमआयडीसीतील आईस फॅक्टरी रस्त्याचे २०० मीटरचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्ता अद्याप तसाच असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हे कामदेखील लवकर व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. खराब रस्ता आणि वाहनकोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याने या रस्त्याच्या पुढील १०० मीटर रस्त्याच्या कामास पालिका प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

येत्या दोनतीन आठवड्यांत या कामासदेखील सुरुवात करण्यात येणार आहे. आईस फॅक्टरी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने या रस्त्याच्या कामासाठी ८३ लाखांचा निधी मंजूर करून त्याचा कार्यादेशदेखील काढला; मात्र गेली चार वर्षे या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली नव्हती. या रस्त्यावर खड्डे बुजवण्याची कामे करण्यापेक्षा या रस्त्याचे पुनर्पृष्ठीकरण आणि काँक्रिटीकरणाची कामे करणे आवश्यक होते. त्यानुसार डोंबिवली बांधकाम विभागाने या रस्त्याच्या पुनर्पृष्ठीकरणाचा प्रस्ताव तयार केला. आमदार निधीतून रस्त्याच्या पहिल्या २०० मीटरच्या रस्त्याचे काम गणेशोत्सव झाल्यानंतर पूर्ण करण्यात आले. या रस्त्याचे काम झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी पुढील रस्त्यावर अद्यापही खड्डे असल्याने हे काम कधी होणार, अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे.
या अर्धवट कामामुळे मानपाडा, आईस फॅक्टरी रस्ता भागात वाहतूक कोंडी आजही कायम आहे. यामुळे दुसऱ्या टप्प्यातील साईबाबा मंदिरपर्यंतच्या १०० मीटरच्या रस्त्याचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. हा रस्ता वेळेत पूर्ण न केल्यास नागरिकांचा रोष कायम राहील म्हणून बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी पुढील रस्त्याचे कामदेखील लवकर व्हावे याविषयी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे व शहर अभियंता अर्जुन अहिरे यांना याविषयी माहिती दिली. पालिका आयुक्तांनी या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

.....................................
वाहतुकीचा विचार करून काम करणार
आईस फॅक्टरी रस्त्यावरून मानपाडा रस्ता, गांधीनगर, स्टार कॉलनी भागातील वाहनांना वळसा घालून जावे लागणार आहे. एमआयडीसी परिसरात महाविद्यालये, शाखा व कारखाने असल्याने वाहतुकीचादेखील विचार करावा लागणार आहे. त्याविषयी सर्व चर्चा करून आखणी करून मग हे काम हाती घेण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

.........................
आईस फॅक्टरी येथील साईबाबा मंदिरपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यातील १०० मीटरच्या रस्ते काम प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. वाहतूक नियोजनाचा आढावा घेत पुढील दोन तीन आठवड्यांत या कामास सुरुवात होईल.
- रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता