वाहतुकीतील अडथळ्यांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतुकीतील अडथळ्यांवर कारवाई
वाहतुकीतील अडथळ्यांवर कारवाई

वाहतुकीतील अडथळ्यांवर कारवाई

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : अंधेरीतील गोखले पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर होणाऱ्या कोंडीची दखल मुख्यमंत्री कार्यालयानेही घेतली आहे. पर्यायी मार्गांवरील फेरीवाले आणि अतिक्रमणे हटवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिल्या होत्या. त्यानुसार गुरुवारपासून पालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. दिवसभरात एकूण ३८९ फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात आली. एस. व्ही. रोडवर प्रामुख्याने कारवाई करण्यात आली.
दरम्यान, महापालिकेच्या के पश्चिम वॉर्डच्या माध्यमातून तब्बल १२ रस्त्यांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पालिकेने काही ठिकाणी फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी पोलिसांकडेही मदत मागितली आहे.

पालिकेने के पश्चिम विभागात फेरीवाल्यांविरोधात सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही पाळ्यांमध्ये कारवाई केली. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यापासून पदपथ दुरुस्ती, फेरीवाल्यांवर कारवाई, भंगार वाहने हटवणे, मार्गिका वळवल्याबाबतचे दिशादर्शक फलक, दुकानांसमोरील रॅम्प हटवणे इत्यादीसारख्या कामांना पालिकेने सुरुवात केली आहे. मुख्यत्वे चार रस्त्यांवर पालिकेने फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली. अंधेरी पोस्ट ऑफिस ते एस. व्ही. रोड जंक्शनदरम्यान १०५ जणांविरोधात कारवाई झाली. इर्ला सोसायटी, गुलमोहर रोड, सिझर रोड इत्यादी भागांत ८६ जणांविरोधात कारवाई करण्यात आली. जे. पी. रोड आणि अंबोली जंक्शनदरम्यान ९१ जण कारवाईत अडकले. अंधेरी ते विलेपार्ले रेल्वेस्थानकादरम्यान १०७ फेरीवाल्यांविरोधात कारवाई झाली.

पालिकेने आतापर्यंत ५२ ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे बुजवले आहेत. काही ठिकाणी असलेले खड्डे लवकरच बुजवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. काही ठिकाणी मेट्रो २ बी अंतर्गत एमएमआरडीएच्या रस्त्यांवर खड्डे आहेत. त्याबाबतची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी लोंबकळणाऱ्या केबलवरही कारवाई करण्यात आली आहे. काही भागात पदपथाची रुंदी वाहतुकीच्या दृष्टीने कमी करण्यात आली आहे. रस्त्यावर पडलेल्या वस्तू आणि दुकानांसमोरील रॅम्पही हटवण्यात आले आहेत. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या सर्व अडथळे हटवण्यावर भर देण्यात आला आहे. वाहतूक बदलाबाबतचे दिशादर्शक फलक आणि नो-पार्किंगच्या सूचनाही लावण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी अनधिकृतपणे पार्क करण्यात आलेल्या वाहनांवरही वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाई सुरू झाली आहे.

कारवाई करण्यात आलेले रस्ते
एस. व्ही. रोड (मिलन सबवे ते व्ही. एम. रोड जंक्शन) (१३०० मीटर), व्ही. एम. रोड ते अंबोली जंक्शन (३००० मीटर), अंबोली जंक्शन ते ओशिवरा नदी (२६०० मीटर), गुलमोहर रोड नं. १ व्ही. एम. रोड ते जुहू सर्कल (२०८० मीटर), एस. व्ही. रोड जंक्शन ते मिठीबाई कॉलेज (३१० मीटर), मिठीबाई कॉलेज जंक्शन ते बीपी पटेल चौक (११०० मीटर), इर्ला रोड (३७० मीटर), एन. एस. फडके रोड (१०५० मीटर), जे. पी. रोड (एसव्ही रोड ते न्यू लिंक रोड) (१८०० मीटर), सिजर रोड (९४० मीटर), न्यू लिंक रोड (५७०० मीटर) आणि दादाभाई रोड (५०० मीटर).

पोलिस संरक्षणाची पालिकेची मागणी
पर्यायी रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या के पश्चिम विभागाने उपायुक्त (वाहतूक) विभागाला पत्र लिहिले आहे. त्यात फेरीवाल्यांविरोधातील कारवाईसाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. जे. पी. रोड, एस. व्ही. रोड, गजधर रोड, अंबोली सिग्नल इत्यादी ठिकाणी डी. एन. नगर वाहतूक पोलिस ठाण्याअंतर्गत फेरीवाल्यांविरोधात कारवाई अपेक्षित आहे. रुबी हॉस्पिटल, बेहरामबाग सिग्नल, एस. व्ही. रोड, अजित ग्लास सिग्नल, जोगेश्वरी (पश्चिम) इत्यादी ओशिवरा वाहतूक पोलिस ठाण्यातील भागांचाही त्यात समावेश आहे. इर्ला सोसायटी रोड, व्ही. एम. रोड (मिठीबाई महाविद्यालय), एस. व्ही. रोड, विलेपार्ले (प) इत्यादी सांताक्रूझ पोलिस ठाण्याच्या अखत्यारीतील भागात बंदोबस्त आणि मनुष्यबळ द्यावे, अशी मागणी के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांनी केली आहे.