आजपासून केडीएमटीच्या तिकीटदरात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजपासून केडीएमटीच्या तिकीटदरात घट
आजपासून केडीएमटीच्या तिकीटदरात घट

आजपासून केडीएमटीच्या तिकीटदरात घट

sakal_logo
By

कल्याण, ता. ११ (बातमीदार) : नवी मुंबई परिवहन विभागाच्या बस तिकीट दराच्या धर्तीवर केडीएमटीच्या बससेवेमधील तिकीट दरात सुसूत्रता आणण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानुसार उद्यापासून (ता. १२) कल्याण-डोंबिवलीकरांना केडीएमटीमधील सामान्य बसमधून सरासरी चार टक्के आणि एसी बसमधून ४५ टक्के कमी दरात प्रवास करता येणार आहे.

इंधन दरवाढ, कर्मचारीवर्गाचे वेतन, समांतर प्रवासी वाहतूक होत असल्याने केडीएमटी आर्थिक संकटात आहे. ताफ्यात १४० हून अधिक बस असल्या, तरी प्रत्यक्षात ९० नॉनएसी आणि १० एसी बस रस्त्यावर काढण्यात केडीएमटीला यश येत आहे. वाढती महागाई पाहता केडीएमटी प्रशासनाने १५ डिसेंबर २०१८ रोजी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. या वेळी बेस्टने मुंबईमधील तिकीट दर कमी केल्याने केडीएमटीच्या तिकीट भाडेवाढीला स्थगिती देण्यात आली. आता ४ मार्च २०२२ रोजी केडीएमटी प्रशासनाने नवी मुंबई पालिकेच्या धर्तीवर प्रस्ताव बनविला असून तो शासनाला सादर केला होता. त्याला मान्यता मिळाल्याने कल्याण डोंबिवलीकरांना कमी तिकीटदरात प्रवास करता येणार आहे.

सामान्य बससाठी पाच रुपयांपासून भाडे
पहिल्या टप्प्यात दोन किलोमीटरसाठी सामान्य बससाठी पाच रुपये प्रतिप्रवासी तिकीट भाडे द्यावे लागणार असून ४५ किलोमीटरवर प्रवास करणाऱ्या प्रवाशाला ५५ रुपये मोजावे लागतील. यात टप्पेनिहाय बदल करत चार टक्के तिकीटभाडे कमी केल्याने पहिल्या आणि शेवटच्या थांब्यावर तिकीट कमी नसले, तरी मधल्या थांब्यावर कमी होणार आहे.

एसी बसचे तिकीट १० रुपयांपासून सुरू
सध्या एसी बसमधून पहिल्या टप्प्यात दोन किलोमीटरवर एका प्रवाशाला १५ रुपये मोजावे लागत आहेत. नवीन तिकीटभाडे प्रतिप्रवासी १० रुपये होणार असून ४५ किलोमीटरवर एसी बसमधून सध्या प्रतिप्रवासी १३५ रुपये मोजावे लागत आहेत. ते नवीन भाड्यामध्ये ६५ रुपयांची कमी म्हणजे सरासरी ७० रुपये मोजावे लागणार आहेत.

केडीएमटीच्या तिकीट भाड्याबाबत प्रस्ताव शासनाला पाठविला होता. त्याला अंतिम मंजुरी मिळाली असून सर्व आवश्यक कार्यवाही करून शनिवारपासून (ता. १२) नवी दराची अंमलबजावणी केली जाईल.
- डॉ. दीपक सावंत,
व्यवस्थापक, केडीएमटी