भोगावती नदीतील तो डमी बॉम्ब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोगावती नदीतील तो डमी बॉम्ब
भोगावती नदीतील तो डमी बॉम्ब

भोगावती नदीतील तो डमी बॉम्ब

sakal_logo
By

पेण, ता. ११ (वार्ताहर) : पेणजवळील भोगावती नदीपात्रात गुरुवारी (ता. १०) बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिस यंत्रणेने तत्काळ धाव घेतली. रायगड आणि नवी मुंबई बॉम्बशोध पथकाला पाचारण करण्यात आले होते. सदर पथकाने जवळपास सात तास तपासणी केल्यावर हा डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाले. यात वायर, पाईप आणि घड्याळ असून धोकादायक स्फोटक नसल्याचे बॉम्बशोधक पथकाने स्पष्ट केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

मुंबई-गोवा महामार्गावरील पेणजवळील भोगावती नदीपात्रात जिलेटिनच्या कांड्या वाहून आल्याचे गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आले होते. त्यामुळे पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली होती. एकीकडे गुप्तचर यंत्रणांनी मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी केला असतानाच पेण येथे नदीपात्रात जिलेटीनच्या कांड्या सापडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणखी अलर्ट झाल्या. त्यांनी रायगड आणि नवी मुंबई बॉम्बशोध पथकाला पाचारण केले होते. सात तासांच्या तपासणीअंती महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ बंद करून ही बॉम्बसदृश वस्तू निकामी करण्यात आली. संध्याकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू होऊन ते शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास संपले.

डमी बॉम्ब कोणी व कोणत्या कारणासाठी ठेवला, याची अधिक माहिती व तपास पेण पोलिस व स्थानिक गुन्हे विभाग करीत असल्याचे पोलिस यंत्रणेकडून सांगण्यात आले.