रिक्षा, टॅक्सी परवाना नूतनीकरणाची क्लिष्ट प्रक्रियेला ब्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षा, टॅक्सी परवाना नूतनीकरणाची क्लिष्ट प्रक्रियेला ब्रेक
रिक्षा, टॅक्सी परवाना नूतनीकरणाची क्लिष्ट प्रक्रियेला ब्रेक

रिक्षा, टॅक्सी परवाना नूतनीकरणाची क्लिष्ट प्रक्रियेला ब्रेक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : रिक्षा, टॅक्सीच्या परवाना नूतनीकरणाची क्लिष्ट प्रक्रिया आता बदलण्यात आली आहे. पाच वर्षांनंतर परवाना वैधता संपल्यानंतर ६ महिन्यांच्या मुदतीत नूतनीकरण न केल्यास मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाकडे पाठवले जात होते; मात्र आता या प्रक्रियेला ब्रेक लावून त्याचे अधिकारही प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी चालक-मालकांना दिलासा मिळणार असून, यासह बेस्ट उपक्रम, रिक्षा, टॅक्सीवर लावण्यात येणारे रुफ लाईट आणि एमएमआर क्षेत्रात नवीन ९२ शेअर रिक्षा, टॅक्सीचे स्टँड तयार करण्याचे निर्णय एमएमआरटीएच्या बैठकीत घेण्यात आले.

परवान्याची वैधता संपून ६ महिने झालेल्या टॅक्सी, ऑटोरिक्षा परवाने यांचे नूतनीकरण प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या स्तरावरच नूतनीकरण करता येणार आहे. यापूर्वी परवान्याची वैधता संपून ६ महिने झालेल्या टॅक्सी, ऑटोरिक्षा परवाने मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत परवाना नूतनीकरण करण्याकरिता सादर करण्यात येत होते. त्यामुळे परवानाधारकांना परवाना नूतनीकरण करण्यासाठी अधिक अवधी लागत होता. मात्र उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केलेल्या याचिकेनंतर ठाराविक कालमर्यादेनंतर कंत्राटी वाहन परवाना नूतनीकरण करण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना बहाल करण्याची तरतूद विचारात घेण्यात आली. त्यामुळे ९ नोव्हेंबरपासून विधिग्राह्यता संपलेल्या मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या क्षेत्रातील सर्व टॅक्सी ऑटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरण महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ७५ (६) अन्वये विलंब शुल्क आकारून प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या स्तरावर परवाना नूतनीकरण सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे परवानाधारकांना परवाना नूतनीकरण करणे सोयीचे व जलद गतीने होण्यास मदत होणार असल्याचे मुंबई सेंट्रलचे आरटीओ भरत कळसकर यांनी सांगितले आहे.
--------------
रुफ लाईट बसवण्याला मुदतवाढ
टॅक्सीवर रुफलाईट बसवणे सक्तीचे करण्याबाबतच्या निर्णयाला मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या टॅक्सींवर १ जुलै २०२१ पासून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या वेळी रुफलाईट बसवणे सक्तीचे करण्याबाबतची निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता या आदेशाला ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
-------------
बेस्टच्या नवीन २००० प्रवासी बसेसचा परवाना मंजूर
बेस्टच्या नवीन २००० प्रवासी बसेस परवाना मंजूर करण्यात आला आहे. यामुळे मुंबईच्या रस्त्यावर सार्वजनिक परिवहन सेवेसाठी अधिक बसेस धावतील व प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
-----------
नवीन ९२ स्टँडला मान्यता
मुंबई महानगर परिवहन प्राधिकरणाच्या क्षेत्रातील विविध ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनांनी नवीन ऑटो रिक्षा टॅक्सी स्टँड उभारण्याकरिता मागणी केली होती. त्यानुसार वाहतूक विभाग, महापालिका आणि परिवहन विभाग यांच्या संयुक्त सर्वेक्षण करून मुंबई महानगर परिवहन प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये नवीन ७३ ऑटोरिक्षा स्टॅण्ड, ७ शेअर-रिक्षा स्टॅण्ड, ९ टॅक्सी स्टॅण्ड व ३ शेअर-टॅक्सी स्टॅण्ड उभारण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली.