पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडी सरस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडी सरस
पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडी सरस

पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडी सरस

sakal_logo
By

मनोर, ता. ११ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदांसाठी शुक्रवारी (ता. ११) झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरस ठरली. जिल्ह्यातील आठपैकी पाच पंचायत समित्या महाविकास आघाडीने आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. उर्वरित प्रत्येकी तीन पंचायत समित्या भाजप, शिंदे गट आणि बविआकडे आल्या आहेत. निवडणुकांचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

डहाणूमध्ये अटीतटीची लढत
डहाणू (बातमीदार) : पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. अत्यंत अटीतटीच्या लढतीत चिठ्ठीद्वारे काढलेल्या कौलामध्ये सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण गवळी; तर उपसभापतिपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पिंटू गहला यांनी बाजी मारली. डहाणू पंचायत समितीत एकूण २६ सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ९, शिवसेना ८, भाजप ७ आणि माकपचे दोन सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण गवळी आणि उपसभापतिपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पिंटू गहला यांनी अर्ज भरले होते. दुसऱ्या बाजूला विरोधात भाजपचे वसंत गोरवाला आणि बाळाहेबांची शिवसेना गटाचे भूनेश गोलिम यांनी उपसभापतिपदासाठी अर्ज भरला होता. पंचायत समिती सभागृहात निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी यांच्या उपस्थितीत झालेल्या मतदानात सभापती आणि उपसभापती दोन्ही गटांना १३ - १३ समसमान मते पडल्याने अखेर चिठ्ठी टाकून घेतलेल्या कौलामध्ये राष्ट्रवादीच्या गवळी यांनी आणि गहला या विजयी झाल्याचे घोषित केले.

विक्रमगडमध्ये उपसभापतिपदासाठी लढत
विक्रमगड (बातमीदार) : पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी साखरे गणातील राष्ट्रवादी पक्षाचे यशवंत धर्मा कनोजा यांची बिनविरोध; तर उपसभापतिपदासाठी आलोंडे गणातून अपक्ष (जिजाऊ संघटना) निवडून आलेले विनोद केशव भोईर यांची निवड झाली. विक्रमगड पंचायत समिती सभापतिपद आरक्षण अ. ज. पुरुष असल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक असल्याने कनोजा यांचा एकमेव अर्ज आला होता. उपसभापतिपदासाठी भाजपचे सुभाष शंकर भोये; तर अपक्ष (जिजाऊ संघटना) विनोद केशव भोईर यांचे अर्ज दाखल झाले होते. या उपसभापती निवडणुकीत भोईर यांना सात मते मिळाल्याने ते निवडून आले; तर भाजपच्या भोये यांना दोन मते मिळाल्याने त्यांना हार पत्करावी लागली; तर एक सदस्य तटस्थ राहिला. या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून संदीप पवार (उपजिल्हाधिकारी, पालघर) यांनी काम पाहिले.

पालघरमध्ये बिनविरोध निवडणूक
पालघर (बातमीदार) : पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत महाविकास तथा उद्धव ठाकरे गटाच्या शैला कोल्हेकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद वडे यांची बिनविरोध निवड झाली. सभापतिपदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. उपसभापतिपदासाठी भाजपकडून दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीच्या मिलिंद वडे यांचा उपसभापतिपदाचा मार्ग सुखकर झाला. सभापती व उपसभापती बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर उपस्थित होते.

तलासरीत सभापतिपदी माकपच्या सुनीता शिंगडा
डहाणू : पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीत सभापतिपदी माकपच्या सुनीता जयेश शिंगडा; तर उपसभापतिपदी माकपचे नंदकुमार हाडळ यांची बिनविरोध निवड झाली. तलासरी पंचायत समितीमध्ये एकूण दहा सदस्य असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आठ, तर भाजपचे दोन सदस्य आहेत. उपसभापतिपदासाठी नंदकुमार हाडळ; तसेच राजेश खरपडे यांनी अर्ज भरले होते; पण खरपडे यांनी माघार घेतल्याने उपसभापतिपदी हाडळ यांची; तर सभापतिपदी शिंगडा यांची निवड झाली. भाजपचे दोन्ही सदस्य गैरहजर राहिले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पालघर उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांनी काम पाहिले.

मोखाड्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे वर्चस्व
मोखाडा (बातमीदार) : मोखाडा पंचायत समितीवर बाळासाहेबांची शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिंदे गटाचे भास्कर थेतले यांची सभापतिपदी; तर उपसभापतिपदी प्रदीप वाघ यांची बिनविरोध करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकीय गोटात शिंदे गटाचे वर्चस्व निर्माण झाले आहे. पंचायत समितीच्या सहा सदस्यांपैकी पाच सदस्य शिवसेना; तर एक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडून आला होता.

जव्हारमध्ये भाजपची बाजी
जव्हार (बातमीदार) : जव्हार पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. विजया लहारे यांची सभापतिपदी; तर दिलीप पाडवी यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आणल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

वसई - (बविआ)
सभापती - अशोक पाटील (बहुजन विकास आघाडी)
उपसभापती - सुनील अंकारे (बहुजन विकास आघाडी)