स्वयंरोजगारातून सक्षमीकरणावर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वयंरोजगारातून सक्षमीकरणावर भर
स्वयंरोजगारातून सक्षमीकरणावर भर

स्वयंरोजगारातून सक्षमीकरणावर भर

sakal_logo
By

नवी मुंबई, ता.१२ (वार्ताहर): दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगाराव्दारे आर्थिक बळ देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने शहरातील ३३० जणांना स्टॉलचे वितरण करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिकेमार्फत दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी जागा देण्याकरीता फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रतिक्षा यादी तयार काढली होती. या सूचनेला अनुसरून ७१४ दिव्यांगानी महापालिकेकडे अर्ज केले होते. त्यानुसार तत्कालीन महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजित बांगर यांनी सिडकोकडून स्टॉलसाठी राखीव ठेवलेल्या १४ भूखंडांवरील जागेसोबत स्टॉल देण्यास मान्यता देण्यात आली होती. या प्रतिक्षा यादीवरील २ जून ते ८ जुलै या कालावधीत हरकती, सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार निवड झालेल्या ३३० दिव्यांगांना सोडतीतून स्टॉलच्या विभागाचे नाव, भूखंड क्रमांक व स्टॉल क्रमांक जाहीर करण्यात आले. यात बेलापूर ११, नेरुळ ५४, वाशी ४१, तुर्भे ७५, कोपरखैरणे ३९, घणसोली ४३, ऐरोली ४७ व दिघा १८ अशा एकूण ३३० जागांचे वाटप करण्यात आले. तसेच जागा वाटप झाल्याबाबतचे सूचनापत्रही देण्यात आले.
-----------------------------------
पारदर्शक प्रक्रियेवर भर
वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात गुरुवारी पारदर्शक पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. या सोडतीच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती मालमत्ता विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी सादरीकरणाव्दारे विशद केली. त्यानंतर विभागनिहाय यादीतील दिव्यांग व्यक्तीचे नाव जाहीर करून सर्वांसमक्ष शालेय विद्यार्थ्यांमार्फंत एकेका स्टॉलची चिठ्ठी उचलण्यात आली.
------------------------------------------
२००३ पासून पालिकेचा पुढाकार
नवी मुंबई महापालिकेने यापूर्वी प्रथमत: २००३ मध्ये दिव्यांगांना १७१ जागा उपलब्ध करून दिलेल्या होत्या. दिव्यांगाचा सदर करारनामा संपुष्टात आल्यानंतर, २०१९ मध्ये एकूण ११० दिव्यांगाच्या करारनाम्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर आता ३३० दिव्यांगाना जागा व स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत.