यंदा लाल मिरचीचे भाव वधारले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा लाल मिरचीचे भाव वधारले
यंदा लाल मिरचीचे भाव वधारले

यंदा लाल मिरचीचे भाव वधारले

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १३ (बातमीदार) : दिवाळी सणासुदीनंतर मिरचीची आवक वाढायला सुरुवात होते; मात्र वर्षभरासाठी मिरच्या घेताना आता गृहिणींना विचार करावा लागणार आहे. कारण बाजारपेठेत मिरचीची आवक घटल्याने किमती वधारल्या आहेत. यंदा मिरचीचे भाव दुपटीने वाढले आहेत. डोंबिवलीच्‍या बाजारपेठेत लाल मिरच्‍यांना मोठी मागणी असून भाव वधारल्‍यामुळे ग्राहकांना हात आखडता घ्‍यावा लागत आहे.
परतीच्‍या पावसाचा फटका लाल मिरचीच्‍या उत्पादनाला बसला असून मिरचीचे भाव यंदा वाढलेले आहेत. भाजी, फळांबरोबर मिरचीच्या उत्पादनातही मोठी घट झाली असून लाल मिरची प्रचंड महाग झाली आहे. मिरचीची वाढती मागणी आणि कमी पुरवठा यामुळे मिरचीचे भाव वाढलेले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्‍या पावसामुळे मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नवीन पीक घेण्यास वेळ असल्याने मिरचीचे भाव हे अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
साधारण मिरचीचा नवा हंगाम मार्च ते मे असा तीन महिन्यांचा असतो. त्यामध्ये सर्वात जास्त मिरचीचे उत्‍पादन हे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये होते. यंदा पाऊस लांबल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्‍टोबरमध्‍ये अति पावसामुळे मिरच्यांचे उत्पादन कमी झाले.
आंध्र प्रदेशात सर्वाधिक लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर कर्नाटक व मध्य प्रदेशात घेतले जाते. महाराष्ट्रातील खानदेशात लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. तेलंगणात तिखट; तर कर्नाटकात कमी तिखटाच्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. कर्नाटकातून येणाऱ्या मिरचीला ४७ हजार ते ५२ हजार प्रतिक्विंटल भाव मिळत आहे; तर आंध्र प्रदेशातील मिरचीला ३० ते ३२ हजार रुपये भाव मिळत आहे.
------------------
बेडगी मिरचीही महागली
बेडगी मिरचीसाठी तर ४७ हजारांहून अधिक रुपये क्विंटलमागे मोजावे लागत आहेत. दोन महिन्यांपूर्वी हेच मिरचीचे दर ३० हजार रुपयांवर होते. आता तेच ६० ते ७० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात मिरची तब्बल ५५० ते ६०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. मिरचीच्या जुन्या साठ्यातील चांगल्या प्रतीची मिरची संपली आहे. दुय्यम दर्जाची मिरची कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे मिरचीची भाववाढ झाली असून डिसेंबरपर्यंत मिरचीचे भाव असेच राहण्याची शक्यता असल्‍याचे विक्रेता आनंद पटेल यांनी सांगितले.
------------------------
लाल तिखटही महागणार
अनेक गृहिणी या घरीच लाल तिखट तयार करतात. सुक्या मिरचीचा वापर भाज्यांसाठी किंवा इतर मसाल्यांसाठी केला जातो. आता मिरचीच्या किमती वाढल्याने लाल तिखटाची किमतही वाढणार आहे.
-------------------------------
बेडगी मिरचीची चव आणि रंग हा उत्कृष्ट दर्जाचा असल्याने डोंबिवलीमध्ये बेडगी मिरचीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच गुंटूर मिरची आणि तेजा मिरची यांचीसुद्धा मागणी डोंबिवली बाजारात आहे.
- भुवन सिंग, किराणाविक्रेता