पोलिस गस्तीवर आत स्मार्ट ‘वॉच’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस गस्तीवर आत स्मार्ट ‘वॉच’
पोलिस गस्तीवर आत स्मार्ट ‘वॉच’

पोलिस गस्तीवर आत स्मार्ट ‘वॉच’

sakal_logo
By

प्रकाश लिमये
भाईंदर : गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आधुनिकतेची कास धरत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत आता स्मार्ट ई-बीट योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी मोबाईल ॲप विकसित करण्यात आले असून या ॲपद्वारे गस्तीवरील पोलिस निश्चित करून देण्यात आलेल्या बीट पॉईंटला भेट देतात की नाही, यावर वरिष्ठांना लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
मिरा-भाईंदरसह वसई-विरार शहरांमध्ये तसेच महामार्ग परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरी, लुटमारी करण्याच्या प्रकारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध बीट पॉईंट तयार करण्यात आले आहेत. आयुक्तालयाच्या १६ पोलीस ठाण्यांतर्गत एकूण ७५२ बीट पॉईंटची निवड करण्यात आली आहे. गस्त घालणाऱ्‍या पोलिस कर्मचाऱ्‍यांना दररोज या बीट पॉईंटना भेट देणे आवश्यक आहे.
गस्त घालणारे या बीट पॉईंटना भेट देतात की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट बिट पॉईंट या नावाने मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहेत. आयुक्तालयातील १,२१७ पोलिस अधिकारी व कर्मचारी या ॲपशी मोबाईलद्वारे जोडले गेले आहेत. सुरुवातील काशीमिरा, माणिकपूर, पेल्हार व विरार या पोलिस ठाण्यांचाच यात समावेश होता; मात्र आता सर्व पोलिस ठाणी या ॲपशी जोडली गेली आहेत. गस्तीवरील पोलिस कर्मचारी बीट पॉईंटवर पोहोचला की नाही, त्याने एकंदर किती बीट पॉईंटना भेटी दिल्या, किती बीट पॉईंटना भेट दिली नाही, याची माहिती मोबाईल ॲपमध्ये नोंदवली जाते. त्यामुळे संबंधित पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना त्याची लगेचच माहिती मिळणार आहे.

शहरात गुड मॉर्निंग स्पॉट
आयुक्तांच्या सूचनेनुसार शहरात गुड मॉर्निंग स्पॉट देखील सुरू करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने शहरातील धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. या धार्मिक स्थळांच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हे गुड मॉर्निंग स्पॉट तयार करण्यात आले आहेत. पोलिस कर्मचाऱ्‍यांकडून सकाळच्या वेळी या सर्व ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली जाते. गुड मॉर्निंग स्पॉट अद्याप स्मार्ट ई बीटना जोडण्यात आलेले नाही. मात्र ते कामही लवकरच पूर्ण केले जाणार आहे.

सीसीटीव्हीचे जाळे उभारणार
पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करणे व महिलांची सुरक्षितता यावर भर दिला आहे. आयुक्तालयात सध्या २,२५० पोलिस कर्मचारी आहेत. आयुक्तालयामार्फत नागरिकांच्या मदतीकरिता ११२ क्रमांकाची फोन सुविधा सुरू करण्यात आली आहे. आयुक्तालयाचे गुन्ह्याचा यशस्वी तपास करण्याचे प्रमाणही ७८ टक्के इतके आहे. गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये सीसीटीव्ही कॅमे‍ऱ्यांची पोलिसांना मोठी मदत होते. यासाठी सध्या शहरात ५८६८ कॅमेरे आहेत, याव्यतिरिक्त ५०० ते ६०० कॅमेरे महापालिकेच्या सहकार्याने शहरात लावण्यात येणार आहेत.