बोलका कावळा पाळणारा अवलिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोलका कावळा पाळणारा अवलिया
बोलका कावळा पाळणारा अवलिया

बोलका कावळा पाळणारा अवलिया

sakal_logo
By

तुर्भे, बातमीदार :
आजवर आपण कुत्रा, पोपट, मांजर आणि कबुतरे पाळण्याची अनेकांना आवड असल्याचे पाहिले आहे; पण घणसोली गावातील दिलीप म्हात्रे यांच्या घरी गेल्या आठ वर्षांपासून कावळा राहत असून बोलणारा हा कावळा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
-------------------------------
घणसोली गावातील दिलीप म्हात्रे यांना खाडीकिनारी असलेल्या साईबाबा मंदिराजवळ आठ वर्षांपूर्वी जखमी अवस्थेतील कावळ्याचे एक लहानसे पिल्लू सापडले होते. या कावळ्याची अवस्था बघता दिलीप म्हात्रे यांनी त्या पिल्लाला वाचवण्याचा निर्णय घेतला. दोन महिने त्याच्यावर उपचार करण्यात आले. सहा महिन्यानंतर पंखांची संपूर्ण वाढ झाल्यानंतर त्याला घराबाहेर सोडले असता. तो परत घरीच येऊ लागल्याने अखेर त्या कावळ्याला पाळण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तेव्हापासून आजवर आठ वर्षांचा कालावधी उलटूनही कावळा घरातच त्यांच्या कुटुंबासोबत राहत आहे. या कावळ्याबरोबर त्यांनी चार घारींची पिल्ले आणि एक घुबडदेखील पाळले होते; पण पंखांची वाढ झाल्यानंतर तीन घारी उडून गेल्या; मात्र आजही म्हात्रे यांच्या घरात कावळा, घार आणि पोपट मनोमन रमले आहेत. याशिवाय ते सर्पमित्रदेखील असून त्यांनी आत्तापर्यंत असंख्य विषारी आणि बिनविषारी सापांना पकडून जीवदान दिले आहे.
--------------------
घरातील सदस्याप्रमाणे वागणूक
दिलीप म्हात्रे यांनी कावळ्याचे राजा असे नाव ठेवले आहे. त्यांच्या नावाने हाक मारल्यावर कावळा त्या हाकेला साद देतो. आता तर दिलीप म्हात्रे यांची पत्नी गीता आणि १४ वर्षांची त्यांची मुलगी तेजस्वी यांच्यासोबतदेखील कावळ्यासोबत संवाद साधतात. त्यामुळे घरातील एक सदस्य असल्याची भावना म्हात्रे कुटुंबीयांमध्ये तयार झाली आहे.