कोरोनानंतर मधुमेहाच्या रुग्णांत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनानंतर मधुमेहाच्या रुग्णांत वाढ
कोरोनानंतर मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

कोरोनानंतर मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

sakal_logo
By

विरार, ता. १२ (बातमीदार) : भारतामध्ये कोरोनाची महामारी आल्यानंतर शारीरिक व मानसिक समस्या वाढल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. यात मधुमेह रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या तीन दशकात भारतामध्ये मधुमेहाच्या रुग्णांमध्ये १५० टक्क्यांची वाढ झाली आहे.
सध्या भारत हे जगातील दुसऱ्या क्रमांकावर प्रौढांमध्ये मधुमेह असणारा देश असून चीन पहिल्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये २५ ते ३४ वयोगटातील शहरी व ग्रामीण भागात टाईप २ मधुमेहाचे रुग्ण आढळून येत आहे. याविषयी ॲपेक्स रुग्णालयाचे मधुमेह तज्ज्ञ डॉ. हार्दिक ठक्कर यांनी सांगितले की, आपल्याला मधुमेह झाला हे कळल्यावर रुग्ण आपली स्वतःची काळजी घेतो. परंतु ज्या नागरिकांना प्री-डायबिटीज आहे ते बेफिकिरीने आयुष्य जगत असतात. प्री-डायबिटीज ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोजच प्रमाण जास्त होते. मात्र, प्री-डायबिटीज असलेल्या लोकांना मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. मधुमेहामुळे हृदयविकाराचा झटका आणि मूत्रपिंडाच्या समस्या निर्माण होतात. प्री-डायबिटीजमुळे हृदयाचा झटका, स्ट्रोक आणि किडनीच्या समस्या यासारख्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. प्री-डायबिटीजमध्ये रुग्णांनी हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी निरोगी आहार आणि किमान १५० मिनिटे नियमित व्यायाम करायलाच हवा. प्री-डायबिटीजच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तींवर योग्य वेळी उपचार न केल्यास मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो.
.....
वेळोवेळी आरोग्य तपासणी गरजेची
एका अभ्यासानुसार, प्री-डायबिटीज असलेल्या लोकांना केवळ एका वर्षात मधुमेह होण्याचा धोका १० टक्के असतो. तर आयुष्यभर मधुमेह होण्याचा धोका ७० टक्क्यांपर्यंत असतो. प्री-डायबिटीजवर योग्य वेळी उपचार सुरू केले तर मधुमेहाची समस्या सहज टाळता येते. जे निरोगी जीवनशैलीचा अवलंब करतात, त्यांची ही समस्या आपोआप संपुष्टात येऊ शकते. भारतामध्ये मधुमेह रुग्ण वाढत असताना प्री-डायबिटीज ही समस्या मूळ धरू लागली आहे. त्यामुळे जर आपण लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल या समस्येने त्रस्त असाल तर वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी जेणेकरून मधुमेहाचा धोका टाळता येईल अशी माहिती डॉ. हार्दिक ठक्कर यांनी दिली.