ग्रामपंचायतीत बविआला अस्तित्व टिकवण्याचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायतीत बविआला अस्तित्व टिकवण्याचे आव्हान
ग्रामपंचायतीत बविआला अस्तित्व टिकवण्याचे आव्हान

ग्रामपंचायतीत बविआला अस्तित्व टिकवण्याचे आव्हान

sakal_logo
By

संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. १२ : वसई तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ११ ग्रामपंचायतींपैकी फक्त ४ ग्रामपंचायतीवर आपले सरपंच निवडून आणणाऱ्या वसईतील सत्ताधारी बविआसमोर तालुक्यातील आगामी १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपले अस्तित्व टिकविण्याचे आव्हान आहे. त्यामुळे वसई विरार महापालिकेत तसेच पंचायत समितीवर सत्ता असलेल्या आणि तीन आमदार असलेल्या बविआने या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.
वसई पूर्वेकडील १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहेत. तर नुकत्याच पार पडलेल्या ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी बविआला फक्त चार सरपंचच निवडून आणता आले होते. पूर्व पट्टीत बविआच्या विरोधात शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेने मोठे आव्हान तयार केले आहे. त्यामुळे आता होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बविआने आतापासून रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे.
....
बैठकांचे सत्र सुरू
वसईच्या पूर्व भागात १८ डिसेंबर रोजी होत असलेल्या १५ ग्रामपंचायत निवडणुकांत बविआला पुन्हा अपेक्षित यश न मिळाल्यास त्याचा परिणाम दोन वर्षात होणाऱ्‍या विधानसभा निवडणुकीवर होऊन ग्रामीण भागात बविआला मोठा फटका बसू शकतो. भविष्याची पावले ओळखूनच बविआने ग्रामीण भागात पुन्हा नव्याने सुरुवात करत रणनीती आखण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू केले आहे.
....
तिरंगी लढत
गेल्यावेळेप्रमाणेच पूर्व पट्टीत होत असलेल्या या निवडणुकीत बोईसरचे आमदार राजेश पाटील, माजी खासदार बळिराम जाधव आणि ठाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांना आपले अस्तित्व पणाला लावावे लागणार आहे. या भागात एकनाथ शिंदे गटाचे शिवसैनिक नसले तरी श्रमजीवी संघटनेच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बळ मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपचा करिष्मा मात्र याठिकाणी दिसून येत नाही तर काँग्रेसचे थोडेसे अस्तित्व दिसत असले तरी राष्ट्रवादी मात्र कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे निवडणुकीत बविआ विरोधात सेना आणि श्रमजीवी संघटना यांच्यातच होणार आहे. असे चित्र दिसत आहे.