मध्य रेल्वेची सुरक्षा भक्कम होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेची सुरक्षा भक्कम होणार
मध्य रेल्वेची सुरक्षा भक्कम होणार

मध्य रेल्वेची सुरक्षा भक्कम होणार

sakal_logo
By

सुरक्षेची मदार सीसीटीव्हीवर!
मध्य रेल्वेमार्गावर ३,१७८ अत्याधुनिक कॅमेऱ्यांची भर

नितीन बिनेकर, मुंबई
मुंबईतील स्थानकांवरील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी रेल्वेतर्फे सीसी टीव्ही कॅमेरे वाढवण्यात येणार आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ३ हजार ४३२ सीसीटीव्ही कार्यरत आहेत. त्यात आणखी ३ हजार १७८ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भर पडणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
-

सध्या मध्य रेल्वेच्या मुंबईतील विविध स्थानकांवर ३ हजार ४३२ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. काही प्रमुख स्थानकांत १ हजार १५४ सीसीटीव्ही कॅमेरे इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीमअंतर्गत आणि ८९ व्हीएसएस प्रणालीअंतर्गत आहेत. स्थानकांवरील प्रत्येक हालचालीवर कॅमेऱ्याची नजर असते; तरीही गर्दीचा फायदा घेऊन अनेकदा तरुणी व महिलांची छेड काढणे आणि मोबाईल-पाकीटचोरीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर येत आहे. त्याची दखल घेत आता ३,१७८ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. मार्च २०२३ पर्यंत ते बसविण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, दादर, कल्याण आणि ठाणे अशा सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वेस्थानकांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्याशिवाय हार्बर मार्गावरील सीसीटीव्हीच्या टप्प्यात नसलेले ‘ब्लॅक स्पॉट’ही सुरक्षित करण्यात येणार आहेत.

हार्बर मार्गावर सीसीटीव्ही वाढणार
हार्बर मार्गावरील बहुतांश स्थानक परिसर सीसीटीव्ही कॅमेरा क्षेत्रात येत नाही. परिणामी चोरट्यांचे फावते. त्याचा फायदा उचलत चोरटे त्याच परिसरात चोरी करत असल्याच्या घटना वाढत आहेत. सीसीटीव्हीच्या मर्यादेमुळे त्यांचा शोध घेण्यात रेल्वे पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. त्यावर उपाय म्हणून हार्बर रेल्वेस्थानकांवरील चोरीचे ब्लॅक स्पॉट शोधण्यात आले. आता त्यांच्या टप्प्यात नवे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील स्थानके अधिक सुरक्षित होतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मानखुर्द, वडाळा आणि पनवेल स्थानकांना प्राधान्य
सध्या हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकात ६४ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यात आणखी ८१ कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. मानखुर्द स्थानकावर ४३ कॅमेरे आहेत. त्यात ६० नवीन कॅमेऱ्यांची भर पडेल. वडाळ्यात ५७ आणि रे रोड स्थानकात २६ अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

९५ महिला डब्यांत २८५ सीसीटीव्ही
रेल्वे प्रवासादरम्यान महिलांची छेडछाड, विनयभंग, चोरीच्या उद्देशाने मारहाण इत्यादी गुन्हे घडतात. त्यांना आळा घालण्यासाठी १९ लोकलमधील ९५ महिला डब्यांत २८५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. आयसीएफने तयार केल्या १० ‘मेधा’ लोकलमध्ये ४०० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. लांब पल्ल्याचा मेल-एक्स्प्रेस गाड्या आणि मेमू-डेमू मिळून मध्य रेल्वेच्या १७५ डब्यांत ५६२ सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

तीन हजारपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णयाचे स्वागत. स्थानकावर आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गरजे आहे. त्याकरिता कॅमेऱ्यांचे मॉनिटरिंग प्रभावी पद्धतीने व्हायला हवे.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. रात्रीच्या वेळीही महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर बारकाईने लक्ष द्यावे. जेणेकरून फेरीवाले आणि अंधश्रद्धेच्या जाहिराती चिटकविणाऱ्या आळा घालता येईल.
- वृषाली आंब्रे, प्रवासी, डोंबिवली

नव्या सीसीटीव्हींमुळे आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांना गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यास मदत होईल. सीसीटीव्हींमुळे रेल्वे पोलिसांना प्रवाशांचा गर्दीवरही लक्ष ठेवता येईल.
- ए. के. जैन, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

दीड वर्षांत १४ हजारपेक्षा जास्त गुन्हे
जानेवारी २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान १४,३३४ गुन्ह्यांची नोंद झाली. जानेवारी ते डिसेंबर २०२१ दरम्यान ६,७१९ गुन्हे नोंदवले गेले. २०२२ मध्ये गुन्ह्यांचे प्रमाण ७,६१९ वर पोहोचले. २०२१ पासून जुलै २०२२ पर्यंत ५,८८० गुन्ह्यांचा यशस्वी तपास करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले. जानेवारी-जुलै २०२२ मध्ये दोन हजार ७८५ गुन्हे उघड झालेत.

स्थानकांवरील ‘थर्ड आय’
- सध्याचे सीसीटीव्ही ः ३,४३२
- भविष्यातील तरतूद ः ३,१७८

असे असेल सीसीटीव्हीचे जाळे
- सीएसएमटी उपनगरीय विभाग ः ११७
- सीएसएमटी मुख्य टर्मिनस ः २०६
- लोकमान्य टिळक टर्मिनस ः २१४
- कल्याण स्थानक ः २०४
- ठाणे स्थानक ः १६८
- कुर्ला स्थानक ः १६०
- दादर स्थानक ः १५९
- डोबिवली स्थानक ः ४८
- घाटकोपर स्थानक ः ६४
- बदलापूर स्थानक ः ३४

रेल्वेगाड्यांतील सीसीटीव्ही
- लोकलचे ९५ महिला डबे ः २८५ कॅमेरे
- १० ‘मेधा’ लोकल ः ४०० कॅमेरे
- मेल-एक्सप्रेसचे १७५ डबे ः ५०२ कॅमेरे

जानेवारी २०२१ ते जुलै २०२२ मधील गुन्हे
एकूण ः १४,३३४
उकल ः ५,८८०
अटक आरोपी ः ६,२३९
मध्य रेल्वेवरील गुन्हे ः ९,२२२
अटक आरोपी ः ३,७४७
पश्चिम रेल्वेवरील गुन्हे ः ५,११२
अटक आरोपी ः २,४९२