आरोग्यसेवेसह शाळा देखील स्मार्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्यसेवेसह शाळा देखील स्मार्ट
आरोग्यसेवेसह शाळा देखील स्मार्ट

आरोग्यसेवेसह शाळा देखील स्मार्ट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : जिल्ह्यातील शाळा व आरोग्य केंद्रांचा कायापालट करण्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह १०३ शाळांची निवड या योजनेसाठी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. त्यामुळे आता जिल्ह्यातील आरोग्यसेवेसह शाळा देखील स्मार्ट होणार आहे.

ठाणे जिल्ह्यात शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांमध्ये ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १९० उपकेंद्र आहेत. ग्रामीण भागात या केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सुविधांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे; मात्र या ठिकाणी असलेल्या आरोग्य इमारती या जीर्ण झाल्‍या असल्यामुळे पावसाळ्यात पाणीगळती होणे, स्लॅब कोसळणे अशा घटना घडतात. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार गणपत गायकवाड, रईस शेख, बालाजी किणीकर यांनी आरोग्य सेवेबाबतही चिंता व्यक्त केली. ग्रामीण आरोग्य केंद्रासह प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत नाराजी व्यक्त करीत आरोग्य सेवेला बळकटी मिळण्याची गरज असल्याची मागणीही या वेळी करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा व आरोग्य केंद्रांचा कायापालट करण्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश असून यामध्ये शहापूर तालुक्यातील ३, भिवंडी तालुक्यातील सर्वाधिक ८, अंबरनाथ येथील एक; तर मुरबाडमधील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे लवकरच या आरोग्य केंद्रांना स्मार्ट लुक मिळणार असून येथे येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार उपचार मिळणार आहेत.
---------------------------
१०३ केंद्रांतील शाळा
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असल्याची बाब आमदार निरंजन डावखरे यांनी बैठकीत उघडकीस आणली. शाळांची यादीदेखील पालकमंत्री यांच्याकडे सादर केली. त्यातच एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांची झालेली दुरवस्था, दुसरीकडे ग्रामीण भागात स्मार्ट खासगी शाळांचे फुटलेले पेव यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या घसरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा लुक बदलावा व शाळा स्मार्ट व्हाव्यात या उद्देशाने आदर्श शाळा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १०३ केंद्रांतील १०३ शाळांची निवड करण्यात येणार असून या शाळा आदर्श शाळा होणार आहेत.
..............................
खड्डेमय रस्त्यांबाबत नाराजी
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी दिल्लीतून ऑनलाईन हजेरी लावली होती. या वेळी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील खड्डेमय रस्ते आणि वाहतूक कोंडीबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच तातडीने जिल्ह्यातील रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आदी संबंधित यंत्रणांची पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश देण्‍यात यावेत, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.

..................

केवळ ४८ टक्के विकास निधी खर्च
सत्ताबदलानंतर विकासकामांना दिलेल्या स्थगितीमुळे आजमितीला ठाणे जिल्ह्यात फक्त ४८ टक्के विकास निधी खर्च झाला; तर काही विभागांत फक्त १० टक्के निधी खर्च झाला आहे. त्यामुळे उर्वरित ६० टक्के निधी खर्च करण्यासाठी सर्व यंत्रणांनी तातडीने कामाला लागण्याच्या सूचना देत पालकमंत्री शंभुराजे देसाई यांनी २०२३-२४ च्या ४७८ कोटी ६३ लाखांच्या जिल्हा वार्षिक प्रारूप आराखड्यास मंजुरी दिली. ९०२ कोटींचा सुधारित आराखडा राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.