कोवळ्या रोपट्याला ‘शबरी’चा गोडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवळ्या रोपट्याला ‘शबरी’चा गोडवा
कोवळ्या रोपट्याला ‘शबरी’चा गोडवा

कोवळ्या रोपट्याला ‘शबरी’चा गोडवा

sakal_logo
By

बालदिन विशेष
प्रसाद जोशी : वसई
मुले सुदृढ राहावीत, त्यांचे पालनपोषण व्यवस्थित व्हावे म्हणून धडपड केली जाते. पालघर जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण पूर्वी फार होते; मात्र आरोग्य विभागाने राबवलेल्या उपाययोजना आणि विविध स्वयंसेवी संघटनांचे प्रयत्न यामुळे पालघर जिल्ह्यातील हे चित्र आता पालटू लागले आहे. या कोवळ्या रोपट्यांना व गर्भवतींना वेळीच साथ देत ‘शबरी सेवा समिती’ने गेली १३ वर्षे पालघर जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भाग पिंजून काढत या भागातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी कसे होईल यावर भर दिला आहे.
शबरी सेवा समिती या स्वयंसेवी संघटनेची स्थापना २००३ मध्ये झाली. कुपोषित बालके आणि त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कसे कमी होईल याकडे संस्थेने लक्ष केंद्रित केले. या संस्थेने २००९ मध्ये पालघर जिल्ह्यात संस्थेने काम सुरू केले. या वेळी जव्हार, विक्रमगड, वाडा येथे कुपोषित बालके, गरोदर माता यांची काळजी कशी घ्यावी याविषयी प्रबोधनाचा मार्ग निवडला. त्यानंतर हळूहळू संस्था हजारो नागरिकांच्या संपर्कात आली. किशोरवयीन मुलींमध्येदेखील जनजागृती मोहीम हाती घेतली. तसेच इतक्यावर न थांबता नाशिक येथून दर आठवड्यात जिल्ह्यातील बालकांची, गरोदर मातांची तपासणी करता यावी म्हणून डॉक्टर उपलब्ध केले जात आहेत. यातून बालकांचे वय, वजन, आहार व बौद्धिक व शारीरिक क्षमतेची चाचपणी केली जात आहे. या आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन गाव पाड्यात, दुर्गम, अतिदुर्गम भागात केले जात आहे. याचसोबत सामुदायिक डोहाळेजेवण हा उपक्रम राबवून या वेळी महिलांना गरोदरपणात काळजी घेण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे.
------------
५५ सदस्यांचे पाठवळ
संस्थेने सर्वप्रथम रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे काम सुरू केले व त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूरपासून ते वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागात शबरी सेवा समिती कार्य करत आहे. सध्यस्थितीत एकूण ५५ सदस्य काम करत आहेत. यात महिलांचा जास्त सहभाग आहे. त्यामुळे गरोदर मातांना मार्गदर्शन करणे सोपे होत आहे.
एकीकडे कोवळ्या जीवाला वाचवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत; तर दुसरीकडे शबरीसारख्या संस्था दुर्गम भागात जाऊन जनजागृती अभियान राबवत असल्याने नक्कीच कुपोषित बालकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.
-------------
बालकांचे संगोपन व्यवस्थित होणे यासाठी पोषण आहार तसेच वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे. गर्भवतींनी बाळंतपणात कोणती काळजी घेतली पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण दुर्गम भागात सहकारी काम करत आहेत.
- प्रमोद करंदीकर, सचिव, शबरी सेवा समिती
----------------
महिन्यातून दोनदा आरोग्य तपासणी
महिन्यातून दोन वेळा आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले जाते. यात बालकाचे वजन तपासतो. यातून महिनाभरात २०० मुलांची तपासणी केली जाते. त्यांना औषधोपचारांसाठी मदत केली जाते. यामुळे कुपोषित बालकांच्या वजनात वाढ झाली असून त्यामुळे कुपोषित बालकांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे, असे शबरी सेवा समितीचे जव्हारमधील कार्यकर्ते शंकर मेढे यांनी सांगितले.
-------------------
सुदृढ बालक स्पर्धा
शबरी सेवा समिती ‘सुदृढ बालक स्पर्धा’ आयोजित करत असते. यासाठी ग्रामीण भागात जाऊन बालरोगतज्ज्ञांच्या मदतीने मुलाचे वजन, वय तपासून त्यांची शरीरिक क्षमता तसेच मानसिकरीत्या ते कशा प्रकारे प्रतिसाद देतात त्याची चाचपणी केली जात आहे. यातून जी मुले सुदृढ स्पर्धेत विजेती ठरतात त्यांना खेळणी, कपडे, टोपी यासह विविध वस्तू दिल्या जातात. तसेच महिलांनी उत्तम संगोपन केल्याने त्यांनाही साडी भेट देत कौतुक केले जात आहे. त्यामुळे मुलांच्या संगोपनावर विशेष लक्ष दिले जात आहे.
--------------------------
वैद्यकीय सेवा महत्त्वाची
गर्भवतींची आणि बालकांची काळजी केवळ आहरापुरती मर्यादित न राहता वैद्यकीय सेवाही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे, पचनशक्ती तपासणी, प्रबोधन झाले पाहिजे. डॉक्टरांनी संवाद व समन्वय साधणे तितकेच मोलाचे ठरते.
---------------------
जिल्ह्यात प्रमाण घटले
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापर्यंत ४२२ इतक्या बालकांत घट झाली. गरोदर मातांची, बालकांची आरोग्य तपासणी, वजन तपासणे, पौष्टिक आहार, कच्चे कडधान्य, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहाराची व्यवस्था करण्यात येत आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.