मुंबई-पुणे महामार्ग विस्तारीकरण ९० टक्के पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-पुणे महामार्ग विस्तारीकरण ९० टक्के पूर्ण
मुंबई-पुणे महामार्ग विस्तारीकरण ९० टक्के पूर्ण

मुंबई-पुणे महामार्ग विस्तारीकरण ९० टक्के पूर्ण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १२ : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटाला पर्याय म्हणून मिसिंग लिंकची उभारणी सुरू आहे. या मार्गाला जोड म्हणून जुना मुंबई-पुणे या सहापदरी द्रुतगती मार्गाचा विस्तार करून आठपदरी करण्यात येत असून, खालापूर टोलनाका ते खोपोली महामार्गावरील आठपदरी विस्तारीकरणाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकाम महामंडळातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, टोलनाक्यांवरील कोंडी टाळण्यासाठी दोन्ही मार्गांवर प्रत्येकी १७ टोल बुथची उभारणी केली जाणार आहे.

खालापूर टोलनाका ते खोपोली महामार्गावरील सहापदरी रस्त्याचे आठपदरी विस्तारीकरणाचे काम सुमारे ९० टक्के पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकाम महामंडळाने सांगितले. खालापूर टोलनाका ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाचे ८ पदरीकरणाचे ५.८६ किलोमीटरचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. यादरम्यान ३ मोठे पूल, लहान पूल, पाईप कल्व्हर्ट, बॉक्स कल्व्हर्ट अंतर्भूत असून सद्यस्थितीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाने सांगितले.

वीकेंडची संधी साधून पर्यटनासाठी जाणाऱ्या मुंबई आणि पुणेकरांना अनेक वेळा द्रुतगती महामार्गांवर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते; मात्र महामार्गाचे विस्तारीकरण आणि टोल बुथ वाढवल्यानंतर यापासून दिलासा मिळणार आहे. खालापूर टोलनाका ते खोपोली महामार्गाच्या आठपदरी विस्तारीकरणाच्या कामाने वळणदार आणि चढ-उतार असलेल्या बोरघाटात अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. पुणे किंवा मुंबईला जाणाऱ्यांना मिसिंग लिंकचा वापर करता येणार असल्याने कमी वेळात पुणे-मुंबई गाठता येणार आहे.