ठाण्यात आठ कोटींच्या बनावट नोटा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात आठ कोटींच्या बनावट नोटा जप्त
ठाण्यात आठ कोटींच्या बनावट नोटा जप्त

ठाण्यात आठ कोटींच्या बनावट नोटा जप्त

sakal_logo
By

ठाणे, ता. १२ (वार्ताहर) : घोडबंदर परिसरात आठ कोटी रुपयांच्या दोन हजाराच्या बनावट नोटांच्या विक्रीसाठी कारमधून आलेल्या दोघा आरोपींना ठाणे गुन्हे शाखा युनिट - ५ च्या पथकाने अटक केली. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात पालघर जिल्ह्यातील राम हरी शर्मा (वय ५२, रा. बोळिंज, विरार पश्‍चिम) आणि राजेंद्र राऊत (वय ५८, रा. परनाई नाका, कुरगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाला, कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही व्यक्ती बनावट नोटा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार घोडबंदर येथील गायमुख चौपाटीवर पोलिस पथकाने सापळा रचला होता. शुक्रवारी (ता. १२) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कारमधून नोटा विक्रीसाठी आलेल्या शर्मा आणि राऊत यांना ताब्यात घेतले. त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता, गाडीमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांची ४०० बंडले आढळली. या बनावट नोटांचे मूल्य आठ कोटी रुपये असून दोघांनाही अटक करण्यात आली. त्याच्याकडे सदर नोटांबाबत चौकशी केली असता, मदन चौहान यांच्या मदतीने पालघर येथील गोदामात नोटांची छपाई केल्याची माहिती दिली. राम शर्मा याचे पालघर येथील टेक इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये संगणक आणि प्रिंटर आहे. यामध्ये या नोटांची हुबेहूब डिझाईन बनवण्यात आल्याची माहिती पथकाला मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाला आणखी आरोपींचा सहभाग असून एक रॅकेट कार्यरत असल्याचा संशय गुन्हे शाखा युनिट-५ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांनी व्यक्त केला आहे. आरोपींनी नोटांची छपाई केलेल्या कारखान्याचा आणि फरार संशयित आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.