महिलांमध्ये कमरपट्ट्यांची क्रेझ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांमध्ये कमरपट्ट्यांची क्रेझ
महिलांमध्ये कमरपट्ट्यांची क्रेझ

महिलांमध्ये कमरपट्ट्यांची क्रेझ

sakal_logo
By

वैभवी शिंदे, नेरूळ

सुंदर ड्रेस आणि त्यावर मेकअप इतकेच पुरेसे नसते. या सगळ्याला साजेशी अॅक्सेसरी नसेल, तर तुमचा लूक अपूर्ण वाटतो. वेगवेगळ्या अॅक्सेसरीमध्ये आता स्त्रियांमध्ये कमरपट्ट्यांची विशेष क्रेझ दिसून येत आहे. सध्या बाजारात विविध प्रकारचे पट्टे उपलब्ध आहेत. कोणत्याही आऊटफिटला अधिक स्टायलिश आणि आकर्षक बनवण्यासाठी या कमरपट्ट्यांना पसंती मिळत आहे.

स्टायलिंग करताना पट्टा हा महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी पट्टा केवळ जीन्सपुरता मर्यादित होता. सध्या या पट्ट्यांमध्ये नवनवीन ट्रेंड आणि फॅशन पाहायला मिळत आहेत. गाऊन, क्रॉप टॉप, मिडी, जीन्स, स्कर्ट, प्‍लाझो एवढेच नाही, तर साडीलाही पट्ट्याची जोड दिली जात आहे. पेहरावाला आणखी उठावदार करण्यासाठी फॅशनप्रेमी बेल्टचा पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. पेहरावावर मॅचिंग बेल्ट घालण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. पारंपरिक लूकसाठी असलेल्या पट्ट्यांवर सुंदर वर्क केलेले असतात. त्यामध्येही वेगवेगळ्या डिझाइन्स आणि पॅटर्न दिसून येत आहेत. या पट्ट्यांचे प्रकार आणि डिझाइन्सबद्दल जाणून घेऊ या...

इलास्टिक पट्टा : काळा आणि सोनेरी असे नेहमीच भन्नाट दिसणारे कॉम्बिनेशन यात आहे. संपूर्ण काळ्या बेल्टवर विंटेज स्टाईल फुलांच्या डिझाइनचे बक्कल आहे. अत्यंत एलिगंट आणि चिक लूकचा हा बेल्ट वेस्टर्न वेअरसोबत छान दिसतो. पार्टीवेअर साडीवरही हा बेल्ट वापरता येतो.

चामडी पट्टा : हटके आणि आकर्षक काहीतरी हवे असेल चामडी पट्टा वापरला जातो. चंदेरी रंगाचे होल्स हीसुद्धा नेहमीची डिझाइन आहे. पण, या बेल्टचे वेगळेपण आहे त्यासोबत असलेल्या डबल लेअर साखळीमध्ये. या साखळीमुळे हा बेल्ट फारच आकर्षक झाला आहे. जीन्स, प्लाझो, स्कर्टसोबत हा बेल्ट वापरात येतो.

कॉरसेट पट्टा : कॉरसेट पट्टा ही अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेली फॅशन आहे. जीन्स, फ्रॉक, ट्राऊझर, स्कर्ट अशा वेस्टर्न कपड्यांप्रमाणेच साडीसोबतही हा पट्टा अनेकांकडून वापरला जातो. साडीवर तो फार छान दिसतो.

फ्युचरकर्ट चामडी पट्टा : ही फार एलिगंट आणि सुंदर चॉईस आहे. पांढऱ्या पट्ट्यावर लॉकसाठी दोन बारीक कलाकुसर असलेले पीस आहेत. एखाद्या राणीच्या मुकुटात शोभावी, असा मोठा मणी आणि त्याभोवतीची डिझाइन असा लूक यात आहे. या बेल्टमध्ये तुम्हाला काळा आणि ब्राऊन अशा दोन रंगांचे पर्याय मिळतात. वेस्टर्न आणि इंडियन अशा कोणत्याही प्रकारच्या आऊटफिटसोबत हा बेल्ट छान दिसतो.

गोल्डन सिल्व्हर बेल्ट : नऊवारी, तसेच पेशवाई या साड्यांचा लूक अजून सुरेख करण्यासाठी हा बेल्ट वापरला जातो. यावर वधू-वरचे नाव किंवा इतर काही शब्द बेल्टवर कोरीवकाम करून घेतले जातात. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत, यामुळे नववधुकडून या बेल्टला जास्त मागणी आहे.

साडीच्या काठाचा पट्टा : महिलांना सगळे मॅचिंग हवे असते. त्यामुळे ज्या प्रकारे ब्लाऊज आणि साडीचे काठ असतात, त्याच प्रकारे महिला पट्टा शिवून घेत आहेत. हा कोणत्याही साडीवर वापरता येतो. तसेच या बेल्टला पाहिजे त्याप्रमाणे नक्षीदार काम केलेले असते. हिरे, लटकन, गोंडे याच्यामुळे हा बेल्ट अजून उठून दिसतो.

मेटल बेल्ट : हा गोल्डन रंगाचा नाजूक बेल्ट आहे. या पट्ट्याच्या दोन टोकांना पानांची डिझाइन असते आणि त्यातच लॉक आहे. सुंदर शिमरिंग साडी, वन पीस ड्रेसवर हा पट्टा वापरता येतो. याच्या हलक्या गोल्डन रंगामुळे कोणत्याही ड्रेससोबत हा बेल्ट छान दिसतो. मेटलचा हा बेल्ट टिकाऊसुद्धा आहे. हा बेल्ट गिफ्टसाठीही चांगला पर्याय आहे