कळवा खाडी पुलाचे आज लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळवा खाडी पुलाचे आज लोकार्पण
कळवा खाडी पुलाचे आज लोकार्पण

कळवा खाडी पुलाचे आज लोकार्पण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : ठाणे, कळवा परिसराला जोडणाऱ्या कळवा खाडीवरील वाहतूक कोंडीपासून सुटका होण्यासाठी नवीन पूल उभारण्यात आला आहे. अखेर या पुलावरील एक मार्गिका, तसेच मुंब्रा वाय जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या लोकार्पणास मुहूर्त मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या (ता. १३) उद्‍घाटन करण्यात येणार आहे. हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ठाणे ते कळव्याला जोडणाऱ्या १२४ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या ब्रिटिशकालीन पुलाची आयुर्मर्यादा संपली आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यात या पुलाच्या समांतर १९९५ मध्ये ठाणे पालिकेने दुसऱ्या खाडी पुलाची उभारणी केली. त्यात जुना पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद असल्याने दुसऱ्या खाडी पुलावरूनही वाहनांचा ताण अधिक वाढला आहे. त्यामुळे या पुलावर सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होत होती. अशातच तिसऱ्या खाडी पुलाचा प्रस्ताव पुढे आला आणि त्याचे काम २०१४ मध्ये सुरू करण्यात आले. आता या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले आहे. विटावा ते ठाणे पोलिस मुखालय या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून ती वाहतुकीसाठी खुली करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यासंदर्भात भेट घेतली होती. नवरात्रोत्सवाच्या काळात ही मार्गिका खुली करण्याची तयारी सुरू झाली होती. मात्र, तोही मुहूर्त टळल्यामुळे ही मार्गिका केव्हा खुली होणार, अशी विचारणा नागरिकांकडून केली जात होती.

ठाणे-बेलापूर मार्गासाठी स्वतंत्र मार्गिका
नवीन खाडी पुलाची लांबी ३०० मीटरची आहे. या पुलावर कोर्ट नाक्याहून कळव्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी मार्गिका उभारण्यात येत आहे. तसेच साकेतकडून येणाऱ्या वाहनांसाठी वर्तुळाकार मार्गिका उभारण्यात येत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर जाण्यासाठी आणि पादचाऱ्यांकरिता स्वतंत्र मार्गिका उभारण्यात येत आहे. एकूण २.४० किमी लांबीच्या पुलाचे बांधकाम करण्यात येत असून विद्युतीकरण आणि सुशोभीकरण अशी कामे सुरू आहेत. त्यापैकी क्रिकनाका (पोलिस मुख्यालय) येथून बेलापूरकडे (विटावा) जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली होणार आहे.

आठ वर्षांनंतर काम पूर्ण
कळवा पुलाचे काम तीन वर्षांत पूर्ण करण्याची मुदत होती, आता ती मुदतदेखील संपुष्टात आली असून ‘वर्क ऑर्डर’ देऊन आठ वर्षे उलटली; मात्र अद्याप हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नसल्याने चालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.

वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील मुंब्रा वाय जंक्शन उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून या पुलाचे लोकार्पण करण्याचीही मागणी होत होती. या दोन्ही पुलाचे लोकार्पण झाल्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.