ठाण्याच्या दीप रांभियाला दुहेरीत सुवर्णपदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्याच्या दीप रांभियाला दुहेरीत सुवर्णपदक
ठाण्याच्या दीप रांभियाला दुहेरीत सुवर्णपदक

ठाण्याच्या दीप रांभियाला दुहेरीत सुवर्णपदक

sakal_logo
By

ठाणे, ता. १२ : बालपणापासून ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेत बॅडमिंटनचे धडे गिरवणारा, गेली अनेक वर्षे दुहेरी गटात वारंवार स्वतःची छाप उमटवणारा व तीनपेक्षा अधिक राष्ट्रीय सराव शिबिरांत निवडला गेलेला दीप रांभिया याने पुन्हा एकदा आपल्या दिमाखदार खेळीने विशाखापट्टणम येथे झालेल्या अखिल भारतीय सीनियर रँकिंग बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात सुवर्णपदक मिळवून गौरवास्पद कामगिरी केली आहे.
आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे झालेल्या अतिशय मानाच्या या स्पर्धेत भारतातील दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यात राऊंड ऑफ ३२ मध्ये दीप याने अक्षण शेट्टी याला साथीला घेऊन आर्य ठाकोरे व ध्रुव ठाकोरे या जोडीचा २१-१५, २१-१३ असा सहज पराभव करून स्पर्धेत विजयी श्रीगणेशा केला. पहिल्या सामन्यापासून प्रतिस्पर्धी जोडीवर प्रभुत्व गाजवत दीप आणि अक्षण या जोडीने सर्वांनाच आपल्या खेळाची दखल घेण्यास भाग पाडले आहे. पुढील फेरीमध्ये सिद्धार्थ एलांगो व हेमंतगेंद्रा या जोडीचा त्यांनी अटीतटीच्या सामन्यात २१-१९, २१-१७ असा पराभव करून उपउपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली. या स्पर्धेत अजिंक्यपदासाठीचे दावेदार नितीन व पृथ्वी रे या जोडीचा दीप व अक्षण यांनी दीर्घकाळ रंगलेल्या सामन्यात २१-१६, १८-२१, १८-२१ असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीच्या सामन्यात अंजन व रंजन बुरागोहेन या जोडीचा त्यांनी २१-१९, २१-१७ असा सहज पराभव करून पदकाची सुनिश्चिती केली.

अंतिम फेरीत बलाढ्य जोडीवर विजय
अंतिम सामन्यात संपूर्ण स्पर्धेत वरचढ ठरलेले व अतिशय बलाढ्य अशी जोडी समजले जाणारे संजय श्रीवास्तव व गौश शेख यांच्याशी दीप व अक्षण यांनी दोन हात केले. आपल्या सर्वोत्तम खेळाचे सादरीकरण करत या जोडीला २१-१८, २१-८ असे सहज नमून सर्वांना अचंबित केले. या मानाच्या स्पर्धेत दीपने मिळवलेले यश अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्याच सोबत संपूर्ण स्पर्धेत त्याच्या उंचावलेल्या खेळीचे विशेष कौतुक होत आहे. या विजयाबद्दल ज्येष्ठ प्रशिक्षक व ठाणे शहर, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, अक्षय देवलकर व मयूर घाटणेकर तसेच क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आणि ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या संपूर्ण टीमने त्यांचे अभिनंदन केले आहे.