ठाणे जिल्‍ह्याची तंबाखूमुक्तीच्‍या दिशेने वाटचाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे जिल्‍ह्याची तंबाखूमुक्तीच्‍या दिशेने वाटचाल
ठाणे जिल्‍ह्याची तंबाखूमुक्तीच्‍या दिशेने वाटचाल

ठाणे जिल्‍ह्याची तंबाखूमुक्तीच्‍या दिशेने वाटचाल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : जिल्ह्यातील शासकीय संस्थांसह शाळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टपऱ्यांच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येत असते. यामुळे शिक्षणाच्या प्रवाहात असलेल्या बालकांना तंबाखूजन्‍य पदार्थांचे व्‍यसन जडून मोठ्या आजाराला सामोरे जावे लागण्याची वेळ ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सलाम फाऊंडेशन, मुंबई यांच्या सहकार्यातून तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमातून ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील एक हजार २१९ शाळा, १३ आरोग्य संस्था तंबाखूमुक्त झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

भारतासारख्या विकसनशील देशात जिथे बहुतांश जनसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. तिथे तंबाखूसारख्या स्वस्त व्यसनांनी समाजाला ग्रासले आहे. यामुळे होणाऱ्या मृत्यूंना मोठ्या प्रमाणावर होणारी जनजागृती हाच प्रभावी उपाय आहे. ज्या शाळेत देशाची भावी पिढी शिक्षण घेत आहे ती संस्कारक्षम व्हावी, यासाठी शिक्षक प्रयत्न करीत असतात. शाळा व शाळा परिसर हा तंबाखूमुक्त म्हणून ओळखला जावा या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेच्या आवारात जनजागृतीचे तीन बॅनर लावले जात आहेत. तसेच ज्या शाळा तंबाखूमुक्तीचे ११ निकष पूर्ण करतील अशा शाळा ह्या तंबाखूमुक्त म्हणून घोषित करण्यात येत असतात. ठाणे जिल्ह्यातील शहरी भागातील शाळांसह ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची सलाम मुंबई फाऊंडेशनच्या ॲपवर नोंद करण्यात येत असते. तंबाखूमुक्त शाळांमध्ये ठाणे जिल्ह्यातील शहरी भागातील ४२८, ग्रामीण भागातील ७९१ शाळांचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत असलेल्या १३ आरोग्य संस्थादेखील तंबाखूमुक्त झाल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
…......................................
कोट :-
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा तंबाखूमुक्त करण्याचा प्रयत्न करण्‍यात येत आहे. सद्यस्थितीत एक हजार २१९ शाळा तंबाखूमुक्त केल्या गेल्‍या आहेत. जिल्ह्यातील अन्य शाळादेखील तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- डॉ. अर्चना पवार, जिल्हा दंतचिकित्सक, ठाणे