कोविड काळात वाढली रक्तातील साखर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड काळात वाढली रक्तातील साखर
कोविड काळात वाढली रक्तातील साखर

कोविड काळात वाढली रक्तातील साखर

sakal_logo
By

जागतिक मधुमेह दिन
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : कोविडकाळात नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागला. इतर व्याधींबरोबर मधुमेहाचे रुग्णही वाढले. रक्तातील साखर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकांवर तातडीने उपचार करावे लागले. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात तीन वर्षांमध्ये मधुमेहाच्या पाच लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

१४ नोव्हेंबर रोजी असलेल्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त २०२२-२३ साठी ‘मार्ग मधुमेहाच्या काळजीचा’ अशी मुख्य संकल्पना असून आरोग्य क्षेत्रात कार्यरत व्यक्ती व मधुमेही रुग्णांना मधुमेहविषयक गुणवत्तापूर्ण माहिती व शिक्षणाच्या उपलब्धतेची गरज अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे. कोविडपूर्वी म्हणजेच २०१९-२० दरम्यान एकूण १५ हजार ५१० रुग्ण मधुमेहावर उपचार घेत होते. २०२२-२३ दरम्यान रुग्णसंख्या २ लाख ४० हजार २४९ वर जाऊन पोहोचली. म्हणजेच राज्यातील मधुमेह रुग्णांची संख्या जवळपास दहा पटींनी वाढली.

राष्टीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ (२०१९-२०) नुसार महाराष्ट्रातील १५ वर्षांवरील १२.४ टक्के महिला व १३.६ टक्के पुरुषांमध्ये रक्तातील साकरेच्या निर्धारित प्रमाणापेक्षा ती अधिक आढळली. रक्तातील अतिरिक्त साखरेचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरांतील स्त्री-पुरुषांमध्ये जास्त आहे. राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह, हृद्रोग व पक्षाघात प्रतिबंधक आणि नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत सद्यस्थितीत राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येनुसार स्क्रिनिंग कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत ३० वर्षांवरील सर्व व्यक्तींची उच्च रक्तदाब, मधुमेह व सर्वसाधारण आढळणारे तीन कर्करोग (मौखिक, स्‍तन व गर्भाशय मुख) यांची तपासणी करण्‍यात येत आहे.

राज्याची मधुमेहाची आकडेवारी
वर्ष तपासणी रुग्ण उपचार
- २०१७-१८ २८,३८५ १,३४२ १,३२१
- २०१८-१९ २,२२,१०३ १,७०० १,६६८
- २०१९-२० १९,०३,०८६ १५,९२५ १५,५१०
- २०२०-२१ ३४,४३,१२३ १,४१,१२८ १,३९,२८५
- २०२१-२२ ५२,४०,८५४ १,४५,१६२ १,४२,८९७
- २०२२-२३ ५८,५२,५३२ २,४३,३१८ २,४०,२४९
(१ एप्रिल २२ ते ७ नोव्हेंबर २२ पर्यंत)
एकूण १,६६,९०,०८३ ५,४८,५७५ ५,४०,९३०

मधुमेह मोजण्याचे प्रमाण
मधुमेहासाठी रुग्णांची ग्लुकोमीटर व ग्लुकोस्ट्रीपच्या सहाय्याने प्राथमिक तपासणी करण्यात येते. संशयित (रक्तशर्करेचे प्रमाण १४० मिली/डेलीपेक्षा जास्त) आढळलेल्या व्यक्तीस निदानासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले जाते. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत रुग्णाचे निदान केले जाते. उपाशीपोटी व जेवणानंतर दोन तासांनी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले जाते. रक्तशर्करेचे प्रमाण पाहून संबंधित व्यक्तीस मधुमेह असल्याचे निदान करून उपचार सुरू केले जातात.

मधुमेहाची लक्षणे
- खूप तहान व सतत भूक लागणे, वारंवार लघवी होणे, अचानक वजनात अनपेक्षित घट होणे, थकवा, कमजोरी इत्यादी लक्षणे मधुमेहात जाणवतात; मात्र सर्वच व्यक्तींमध्ये अशी लक्षणे जाणवत नाहीत.
- मधुमेह शरीराच्या विविध अवयवांवर दुष्परिणाम करत असल्यामुळे त्याबाबतच्या गुंतागुंतीविषयी सावध राहणे, वेळेत उपचार आणि काळजी घेणे आवश्यक आहे.
-  मधुमेहामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, मूत्रपिंड निकामी होणे, मज्जातंतूंना इजा, पायाच्या बऱ्या न होणाऱ्या जखमा (अल्सर), दृष्टिदोष आणि इतर संसर्ग होण्याची शक्यता असते.

संतुलित आहाराचे सेवन, आहारात साखर, मीठ व तेलाचे कमी प्रमाण, व्यायाम, नियमित वजन तपासणी आणि नियंत्रण व ध्यानधारणेच्या माध्यमातून ताणतणाव कमी करून मधुमेह प्रतिबंध करता येऊ शकतो. आजाराचे वेळेत निदान करण्यासाठी ३० वर्षांवरील सर्वांनी वर्षांतून किमान एकदा मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी करून घ्यावी.
- डॉ. पद्मजा जोगेवार, सहसंचालिका, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम