बाल सुधारगृहातील मुलांना ‘इंग्रजीचे धडे’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाल सुधारगृहातील मुलांना ‘इंग्रजीचे धडे’!
बाल सुधारगृहातील मुलांना ‘इंग्रजीचे धडे’!

बाल सुधारगृहातील मुलांना ‘इंग्रजीचे धडे’!

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : बाल सुधारगृहातील मुले म्हटले तर समाजातील दुर्लक्षित घटक. अशा सुधारगृहातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य बाल हक्क संरक्षण आयोग प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांना इंग्रजीचे धडे देण्यात येणार आहेत. यंदाचा बालदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून भायखळा कारागृहात बालक आणि पालकांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न आहे.

बालदिनाचे औचित्य साधून सोमवारी (ता. १४) गोवंडीतील बाल सुधारगृहातील मुलांसाठी ‘इंग्लिश स्पीकिंग कोर्स’ सुरू करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बाल बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी दिली. मुंबई आणि उपनगरात चिल्ड्रेन एड सोसायटीच्या अंतर्गत नऊ बाल सुधारगृहे आहेत. त्यामध्ये एक हजारपेक्षा अधिक मुले आहेत. सुधारगृहातून बाहेर पडल्यानंतर अशा मुलांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी इंग्रजीची मोठी अडचण जाणवते. त्यावर मात करून मुलांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना इंग्रजी शिकवण्याचा निर्णय शहा यांनी घेतला आहे. मुलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी ‘टीच फॉर इंडिया’ संस्थेमार्फत बालकांमध्ये इंग्रजी सुधारण्यासाठी सुरुवात करून देण्याचा प्रयत्न असल्याचे शहा यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम घेऊन बालदिन साजरा करण्यात यावा, असे मतही त्यांनी मांडले.

भायखळा कारागृहामध्ये १४ नोव्हेंबर रोजी अनोख्या पद्धतीने बालदिन साजरा करण्यात येणार आहे. कारागृहातील बालकांसाठी बाल अधिकार सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. त्याद्वारे ‘बालकांची गळाभेट किंवा बालक व पालक’ यांची भेट घडवून आणण्याचा मनोदयही शहा यांनी व्यक्त केला. पुरुष कैदी असलेल्या आर्थर रोड जेलमध्येही असा कार्यक्रम होणार आहे. परिसरातील अंगणवाडी केंद्रे, लहान वयामुळे तिथे येऊ न शकणारी बालके इत्यादी सर्वांना कार्यक्रमात सामावून घेण्यात येणार आहे.

‘टॅलेंट हंट’ उपक्रम
यंदाचा बालदिन अनोखा व्हावा म्हणून प्रयास संस्था, सीसीडीटी संस्था, जिल्हा महिला व बाल विकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे संयुक्त कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. ‘बाल अधिकार सप्ताहा’अंतर्गत संस्थांमध्ये नवनवीन उपक्रम सुरू करणे आणि मुलांमधील कलागुण ओळखून त्यांना वाव देण्यासाठी जिल्हा क्रीडा विभागातर्फे टॅलेंट हंटसारखे उपक्रमही घेण्यात येणार आहेत, अशी माहिती सुशीबेन शहा यांनी दिली.