पेंढ्यांच्या दरवाढीची शेतकऱ्यांना आनंदवार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेंढ्यांच्या दरवाढीची शेतकऱ्यांना आनंदवार्ता
पेंढ्यांच्या दरवाढीची शेतकऱ्यांना आनंदवार्ता

पेंढ्यांच्या दरवाढीची शेतकऱ्यांना आनंदवार्ता

sakal_logo
By

महेंद्र पवार : सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. १३ : डहाणू तालुक्यात भातशेतीबरोबरच माळरानात शेतामध्ये गवतही मोठ्या प्रमाणात उगवते. शेतकरी, शेतमजूर हे गवत व त्याचबरोबर भातझोडपणी करून राहत असलेल्या पेंढ्यांची (पाओलीची) विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. अशात या पेंढ्यांच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याने शेतकरी सुखावला आहे. कारण शेतकऱ्यांना भातपिकासोबत पेंढ्याच्या स्वरूपात अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. यंदा हा दर प्रतिक्विंटल दोन हजार ते २१०० रुपये इतका आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका हा गवत-पेंढा खरेदीचे कोठार अशी ओळख आहे. या गवताच्या म्हणजेच पेंढ्याच्या वखारी तालुक्यात दिवाळी संपल्यानंतर काही भागात सुरू झाल्या आहेत. या सुक्या गवताला गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला भाव मिळत आहे. यामुळे तालुक्यात गवत खरेदीविक्रीला जोर आला आहे. तालुक्यात अनेक वर्षांपासून गवत- खरेदीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे. वाडा, जव्हार, पालघर, डहाणू तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी पेंढा विकण्यासाठी तालुक्यातील वखारीत आणतात. गेल्या वर्षी तालुक्यात २५ वखारी सुरू होत्या. या वर्षी त्याची संख्या कमी होऊन आठ इतकी झाली आहे.
पावसाळ्यात या पेंढ्याला मोठी मागणी व योग्य भाव असल्यास वखारीमालक मुंबई, गुजरात येथील तबेल्यांमध्ये त्याची विक्री करतात. या वर्षी पावसाळ्यात या पेंढ्याला २० हजार रुपये क्विंटल असा भाव होता, असे वखारमालकानी सांगितले. पूर्वी आदिवासी विकास महामंडळ या पेंढ्याची खरेदी करत होते; परंतु त्यांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ही खरेदी केंद्रे सुरू बंद झाली आहे. सद्यस्थितीत व्यापारी शेतकऱ्यांना पेंढ्यासाठी दोन हजार ते २१०० रुपये क्विंटल भाव देत आहेत; पण गेल्या वर्षी हा दर प्रति टन बाराशे ते पंधराशे इतका होता. शेतकरी यंदाच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
-------
बैलगाड्यांच्या जागी टेम्पो आले
काही वर्षांपूर्वी डहाणू, वाणगाव, कासा, गंजाड या भागात मोठमोठ्या पेंढ्याच्या वखारी होत्या. या वखारींमध्ये पहाटेपासून गाव-पाड्यातून शेतकरी पेंढ्याने भरलेल्या बैलगाड्या घेऊन येत असत. या पेंढ्याची विक्री करून मिळालेल्या पैशांतून शेतकरी जीवनावश्यक वस्तू खरेदी करतात; पण आता काळ बदलला असून या बैलगाड्यांची जागा टेम्पो आणि ट्रकने घेतली आहे.
-----
पेंढ्याची विक्री करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने येत आहेत; मात्र या पेढ्यांचा जास्त दिवस साठा केला, की बुरशी येऊन पेंढा काळा पडतो. त्यामुळे मुंबई, गुजरात येथील व्यापारी या पेढ्यांला भाव कमी देतात. तसेच बेभरवशाच्या पावसाने गवत खराब होत आहे.
- राकेश शिंदे, वखारमालक, धामटणे

.....
वाढती महागाई, निसर्गाचा लहरीपणा, तसेच शेती अवजारे, खते, बियाणे यांचे भाव, मजुरांची मजुरीही वाढली आहे. भातालाही योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे पेंढ्याला अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा.
- सखाराम कोदे, शेतकरी