१८ ते ६९ वयोगट मधुमेहाच्या विळख्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१८ ते ६९ वयोगट मधुमेहाच्या विळख्यात
१८ ते ६९ वयोगट मधुमेहाच्या विळख्यात

१८ ते ६९ वयोगट मधुमेहाच्या विळख्यात

sakal_logo
By

जागतिक मधुमेह दिन

मुंबई, ता. १३ : मुंबईतील १८ ते ६९ वयोगटातील नागरिक मधुमेहाच्या विळख्यात अडकल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. २०२१ मध्ये मुंबईत करण्यात आलेल्या डब्ल्यूएचओ स्टेप्स सर्वेक्षणानुसार १८ टक्के व्यक्तींच्या उपाशीपोटी केलेल्या चाचणीत त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी १२६ मिलिग्रॅमपेक्षा जास्त आढळली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एमआयएस सेलच्या नोंदणी प्रणाली २०२१ नुसार एकूण मृत्यूंपैकी १४ टक्के मधुमेहामुळे झाले आहेत.

मधुमेहाबाबत मोठ्या प्रमाणावर जागरूकता आणि तपासणी गरजेची असल्याचे निष्कर्ष सांगतो. त्या पार्श्वभूमीवर पालिका उच्च रक्तदाबासाठी घरोघरी जाऊन लोकसंख्या आधारित स्क्रीनिंग सर्वेक्षण सुरू करणार आहे. डिसेंबर २०२२ पासून सर्व २४ प्रभागांतील झोपडपट्टी परिसरात आशा आणि आरोग्य सेविकांच्या माध्यमातून एनसीडीचे जोखीम घटक शोधून काढणार आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी पालिकेने सर्व नागरिक, प्रसारमाध्यमे, स्वयंसेवी आणि खासगी संस्थांना डॉक्टरांकडून रक्तातील साखर आणि रक्तदाब तपासण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. आजारांपासून बचाव करण्यासाठी खाण्याच्या सवयी, आहार आणि पुरेशा शारीरिक हालचालींद्वारे निरोगी जीवनशैलीचा प्रचारही केला जाणार आहे.

मुंबईकरांनी दोनशेहून अधिक महापालिका दवाखाने आणि एचबीटी क्लिनिक/पॉलिक्लिनिकमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची तपासणी, निदान आणि उपचारांसाठी असणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ मोहिमेअंतर्गत ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या १,०३,४२० महिलांच्या रक्तातील ग्लुकोजची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी ७,४७५ महिलांमध्ये मधुमेहाचे निदान झाले. सार्वजनिक आरोग्य विभाग भारतीय आहारतज्ज्ञ संघटनेच्या सहकार्याने सर्व महापालिका दवाखान्यांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेहींना आहार समुपदेशन सेवा देत आहे. वर्षभरात एकूण २४,२३० रुग्णांना आहार आणि जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

१४९ योगासन केंद्रे
पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांच्या जीवनशैलीत बदल करण्याच्या गरजेवर भर दिला आहे. २४ प्रभागांत १४९ योगासन केंद्रेही सुरू केली आहेत, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

५० टक्के रुग्णांना कल्पनाच नसते!
संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांच्या मते, ५० टक्के नागरिकांना त्यांच्या मधुमेहाच्या स्थितीबद्दल माहितीच नसते. मधुमेह असलेले नियमित उपचार घेत नसतील, तर त्यांनी गुंतागुंत टाळण्यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे. रक्तातील साखरेची नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

दर महिन्याला ५० हजार जणांवर उपचार
पालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये मधुमेह तपासणीची सुविधा आहे. दर महिन्याला ५० हजारांहून अधिक रुग्ण मधुमेहावर उपचार घेत आहेत. ३० वर्षांवरील व्यक्तींच्या स्क्रीनिंगचे प्रमाण वाढण्यासाठी पालिकेने ऑगस्ट २०२२ पासून १५ रुग्णालयांमध्ये रक्तदाब आणि मधुमेहाची एनसीडी केंद्रे सुरू केली. आतापर्यंत ३२ हजार ९६ जणांनी आपले स्क्रीनिंग करून घेतले आहे.