वसई-विरारचा प्रवास धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई-विरारचा प्रवास धोकादायक
वसई-विरारचा प्रवास धोकादायक

वसई-विरारचा प्रवास धोकादायक

sakal_logo
By

वसई, ता. १३ (बातमीदार) : वसई विरार शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडत आहे. एकीकडे बेवारस वाहने दूर करण्यास प्रशासनाला अपयश येत असतानाच नादुरुस्त रस्ते व निर्माण होणारे अडथळे पाहता वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यामुळे वसई-विरारमधील प्रवास धोकादायक झाल्याचे चित्र आहे. तसेच महापालिका रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करूनही रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने महापालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
वसई-विरार शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रस्तेरुंदीकरण करणे सुरू आहे. यासाठी कोट्यवधींची निविदा काढली जाते; परंतु अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. खड्डे मोठ्या प्रमाणात असून ज्या ठिकाणी रस्त्यांमध्ये असणारे चेंबर आणि मॅनहोलवरील झाकणे रस्त्याच्या मधोमध टाकली जात आहे. तसेच रस्त्यांवर मातीचे ढिगारेदेखील पडलेले आहेत. यामुळे दुर्घटना घडू नये म्हणून काही नागरिकांकडून सावधानता म्हणून झाडांच्या फांद्या किंवा अन्य प्रकारे चालकांना इशारा देण्याचा प्रयत्न केला जातो.
एकीकडे महापालिका उड्डाणपुलाची घोषणा करत असली, तरी रस्त्यांची दुरवस्था झाली असून यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. महापालिका प्रशासनाकडून रस्तेरुंदीकरण करतानाच रस्त्यांची डागडुजीकरिता अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. त्यानुसार विविध मार्गाचे काम केले जाते; परंतु त्याचा दर्जा तपासला जात नाही का, पुन्हा जैसे थे परिस्थिती कशी होते, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
--------------------------------
वसई-विरार महापालिकेकडून रस्तेदुरुस्तीचे काम सुरू आहे. तसेच ज्या ठिकाणी काम झाल्यावर राडारोडा पडला असेल, तो हटविण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच नागरिकांना त्रास होणार नाही, याची प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येईल.
- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, महापालिका
-------------
‘बेवारस वाहनांवर कारवाई करा’
वसई-विरार महापालिका क्षेत्रात औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात आहे. या औद्योगिक वसाहतींमध्ये रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून कोंडीत भर पडत आहे. याचा परिणाम अत्यावश्यक सेवांवरदेखील होत असतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने रस्त्यांचा विकास करताना बेवारस वाहनांवरदेखील कारवाई करणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिक करत आहेत.