मनमानी भाडेवसुलीने प्रवासी हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनमानी भाडेवसुलीने प्रवासी हैराण
मनमानी भाडेवसुलीने प्रवासी हैराण

मनमानी भाडेवसुलीने प्रवासी हैराण

sakal_logo
By

महेश भोईर, सकाळ वृत्तसेवा
उरण, ता. १२ ः रस्ते, रेल्वे आणि इतर दळणवळणाच्या सुविधेत कायम सापत्न वागणूक मिळणाऱ्या उरण शहरात आता रिक्षा चालकांच्या मनमानी कारभाराला नागरिक पुरते कंटाळले आहेत. मनाला वाट्टेल तेवढे शेअर भाडे, मीटरप्रमाणे भाडे न आकारणे, अंगात वर्दी न घालणे आणि प्रवाशांसोबत उद्धट बोलणे आदी तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत. मात्र, या तक्रारींनंतरही वाहतूक पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दुर्लक्ष करत असल्याने उर्मठ रिक्षा चालकांचे फावले आहे.
ओएनजीसी, जेएनपीटी, नौदल, आदी केंद्र सरकारचे उपक्रम आणि इतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खासगी प्रकल्पांमुळे उरण शहराला जागतिक ओळख आहे. आता नव्याने होणाऱ्या शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूमुळे तर उरण शहराचा कायापालट होणार आहे. सिडकोमुळे नव्याने झालेल्या रहिवासी संकुलांमुळे उरणचा चेहरा-मोहरा बदलत चालला आहे. इतर शहरांतील नागरिक उरणमध्ये वास्तव्याला येत आहेत. गावांचे रुपांतर शहरांमध्ये होत आहे. एवढा विकास होत असला तर स्थानिक वाहतुकीच्या समस्या मात्र ‘जैसे थे’ च आहेत. उरण शहरात थेट एस.टी जात नसल्यामुळे अनेकदा डेपोहून रिक्षा प्रवास करावा लागतो. काही भागात थेट एनएमएमटी बस शहरात घेऊन जाते. परंतु, तिची वेळ अनिश्चित असल्याने अनेकदा रिक्षांवरच अवलंबून रहावे लागते. पण या रिक्षाचालकांकडूनच प्रवाशांची लूटमार होत असल्याने दैनंदिन प्रवास कटकटीचा झाला आहे. याप्रकरणी उपप्रादेशिक अधिकारी अनिल पाटील यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
----------------------------------------------
या मार्गावर प्रवाशांची लूट
करंजा ते चार फाटा मार्गावर प्रवाशांची अक्षरक्षः लूटमार सुरु आहे. नियमाने तीन प्रवाशांना परवानगी असताना तब्बल पाच प्रवाशी घेऊन प्रत्येकी २० रुपये भाडे आकारून प्रवाशांची गळचेपी सुरु आहे. हीच स्थिती उरण-मोरा या मार्गावर आहे. हा मार्ग मुंबईकडे जाणाऱ्या नोकरदार प्रवाशांचा असल्याने मोठी वाहतूक असते. परंतु, येथेही प्रत्येकी ३० रुपये आकारले जात आहेत. पेन्शन पार्क ते मोरा, पेन्शन पार्क ते केगाव-दांडा या शेअरींग मार्गावरही प्रत्येकी २० रुपये प्रवाशांना मोजावे लागते. कोट नाका ते टाऊन शिप या मार्गावरही पाच प्रवासी भरल्याशिवाय रिक्षा सुरुच होत नाही.
--------------------------
जेएनपीटीतील कामगारांची अडवणूक
जेएनपीटी आणि आजूबाजूच्या परिसरात तर सीमाशुल्क बिल्डिंग येथून परीसरातील गोदामांमध्ये जाण्यासाठी सामान्य कामगारांकडून प्रमाण पेक्षा जास्त भाडे आकारले जाते. अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरासाठी ६० ते ८० रुपये आकारले जाते. ग्रामीण भागात ही  आगोदर असणारे १० रुपये दर लॉकडाऊनच्या काळात २० रुपये इतके केलेले भाडे आजवर तेवढेच आहे.
---------------------------
प्रवाशांनी सुट्टे पैसे नाही दिले तर उद्धटपणाने वागले जाते. तसेच  तीन आसनी रिक्षामध्ये पाच ते सहा प्रवासी घेऊन जातात. हे पाहून सुद्धा पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलिस कोणतीच कारवाई करीत नाही.
-रणिता भोईर, प्रवासी
-----------------------
नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर आम्ही वेळोवेळी कारवाई करीत असतो. पुन्हा आम्ही स्कॉड नेमून कारवाई केली जाईल.
-अशोक गायकवाड, वाहतूक पोलिस निरीक्षक
-----------------------------
प्रवाशांकडून २० रुपये प्रमाणे शेअर भाडे घेतो. परंतु, आमची रिक्षा चालकांची परिस्थिती बिकट आहे. आता रिक्षांचे प्रमाण वाढल्याने अनेकांना तासंनतास प्रवाशांची प्रतिक्षा करावी लागते. काहींना तर प्रवाशीच मिळत नाही.
-दिनेश हळदणकर, अध्यक्ष, रिक्षा युनियन, गणपती चौक