समान नागरी कायद्याबाबत मुस्लीम राष्ट्रीय मंचाकडून जनजागृती : इंद्रेशकुमार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समान नागरी कायद्याबाबत मुस्लीम राष्ट्रीय मंचाकडून जनजागृती : इंद्रेशकुमार
समान नागरी कायद्याबाबत मुस्लीम राष्ट्रीय मंचाकडून जनजागृती : इंद्रेशकुमार

समान नागरी कायद्याबाबत मुस्लीम राष्ट्रीय मंचाकडून जनजागृती : इंद्रेशकुमार

sakal_logo
By

भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : समान नागरी कायदा धर्मात हस्तक्षेप करेल, असे गैरसमज पसरवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या कायद्याबद्दलचे गैरसमज दूर करून सत्य लोकांसमोर आणण्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच व्यापक जनजागृती करेल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक इंद्रेशकुमार यांनी उत्तन येथे व्यक्त केले.
मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या दोन दिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये करण्यात आले होते. त्याचा रविवारी समारोप झाला. जम्मू-काश्मीरमधून ३७० व ३५ अ कलम हटवण्यात आले. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील तसेच देशभरातील मुस्लिमांचे कोणते नुकसान झाले, त्यांच्यावर कोणता अन्याय झाला, असा प्रश्न विचारून इंद्रेशकुमार यांनी सांगितले, की एक देश एक कायद्याची गरज आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या उत्तराखंडमधील सदस्यांनी यासंदर्भात सर्वेक्षण करून अहवाल सादर केला आहे. या कायद्याबद्दल अपप्रचार सुरू आहे. लोकांना भडकावण्याचे काम सुरू आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंच हा गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेईल, असे इंद्रेशकुमार यांनी या वेळी सांगितले.
तीन तलाकबाबत देशात कायदा झाला हे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मोठे यश आहे. तलाकसारख्या समस्या सोडवण्यासाठी सुलहा केंद्र स्थापन व्यावेत असा प्रयत्न आहे. गेल्या पाच वर्षांत संपूर्ण देशात सातशेहून अधिक कुटुंबांतील वाद सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. महराष्ट्रातही चाळीस अशी प्रकरणे आहेत. त्यामुळे राज्यातही सुलहा केंद्र स्थापन व्हावीत अस प्रयत्न असल्याचे इंद्रेशकुमार यांनी या वेळी सांगितले.
अभ्यास वर्गाला महराष्ट्राच्या ३२ जिल्ह्यांतील २०० प्रतिनिधी उपस्थित होते. देश दहशतवादमुक्त व्हावा यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंचाकडून एक कार्यक्रम आखण्यात आला आहे. हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी, राज्यात संघटना वाढावी तसेच संवेदनशील विषयावर सामंजस्य होण्यासाठी प्रयत्न वाढीस लागावेत यासाठी या अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक इरफान अली पिरजादे तसेच अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.