बेकायदा थांब्यांमुळे अडथळ्यांची शर्यत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा थांब्यांमुळे अडथळ्यांची शर्यत
बेकायदा थांब्यांमुळे अडथळ्यांची शर्यत

बेकायदा थांब्यांमुळे अडथळ्यांची शर्यत

sakal_logo
By

नेरूळ, ता. १४ (बातमीदार)ः नवी मुंबई शहर व परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे प्रवाशांना प्रवासासाठी रिक्षा हा सोयीस्कर पर्याय आहे. अशातच रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन नेरूळ परिसरात कोंडीला निमित्त ठरत आहेत. तसेच ठिकठिकाणी झालेल्या बेकायदा रिक्षाथांब्यांमुळे कामावरून परतणाऱ्या नोकरदारांसह पादचाऱ्यांना अडथळ्यांच्या शर्यतीला सामोरे जावे लागत आहे.
नेरूळ, सीवूड्स या विभागांतर्गत असणाऱ्या मार्गावर वर्षभरात मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या दुतर्फा तसेच सोसायटीच्या प्रवेशद्वारावर आणि चौका चौकात, पदपथांवर रिक्षा थांबे उभारले गेले आहेत. विशेषतः नेरूळ रेल्वे स्थानक परिसरातील पदपथांवर ही समस्या अधिक प्रमाणात भेडसावत आहे. त्यात मीटरऐवजी प्रवाशांकडून तोंडी भाडे आकारले जात असल्याने जादा पैशांच्या लालसेतून प्रवाशांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहेत.
------------------------
पदपथावर रिक्षा थांबे
नेरूळ पूर्व भागात स्थानकातून बाहेर पडल्यानंतर सन्मान हॉटेलच्या दिशेने जाणाऱ्या पदपथावरच रिक्षाचालकांनी रिक्षा थांबा तयार केला आहे. या घुसखोरीमुळे नागरिकांना तसेच प्रवाशांना रस्त्यावरच चालावे लागत आहे. येथून उलव्याला जाणाऱ्या प्रवाशांकडून तोंडी भाडे आकारले जाते.
-------------------------
गणवेशाचा विसर
वाहतूक नियमांनुसार चालकांना स्वतःचा बॅच, परमिट, कागदपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक आहे. तसेच कागदपत्रांबरोबर रिक्षा चालवताना गणवेश परिधान करणेदेखील बंधनकारक आहे; परंतु अनेकदा रिक्षाचालक गणवेशाचा वापर करत नसल्याचे दिसत आहे.
--------------------------
तोंडी भाडे आकारण्याची सवय
नेरूळ परिसरात बहुतांश रिक्षाचालक मीटरचा वापर न करता तोंडी भाडे आकारतात. कमी अंतरावर जायचे असेल, तरी तोंडी भाडे घेतले जाते. अनेकदा जर प्रवाशांनी मीटरनुसार पैसे देऊ केले तर भाडे नाकारण्याचे प्रकारही होतात.
---------------------------
अल्पवयीन चालकांकडे दुर्लक्ष
कमी वयाची मुले रात्रीच्या वेळी रिक्षा चालवतात. अनेकदा रिक्षात जोरजोरात गाणी लावून रिक्षा वेगात चालवण्याचे प्रकार नेरूळच्या पश्चिम व पूर्व विभागात होत आहे; पण आरटीओकडून अशा अल्पवयीन चालकांवर कारवाई होत नसल्याने प्रवाशांचा जीव नाहक धोक्यात टाकला जातो.
--------------------------
रिक्षाचालकांची दादागिरी
नवी मुंबई तसेच पनवेल भागात रिक्षा थांब्यावर इतर भागातील रिक्षाचालकांना प्रवासी घेऊन जाण्यास मनाई केली जाते. नेरूळ, सेक्टर ८ येथील तसेच रेल्वेस्थानक परिसरात रिक्षाचालक अनेकदा मद्यप्राशन करून रिक्षा चालवतात. त्यामुळे प्रवाशांसोबत वादावादीचे प्रकार झाले आहेत.
------------------------------------------
हात दाखवूनदेखील रिक्षाचालक रिक्षा उभी करत नाही. अनेकदा मीटर एेवजी प्रवाशांकडून तोंडी भाडे मागितले जाते. त्यामुळे नाहक अवास्तव पैसे द्यावे लागतात.
- अनिल जेजुरकर, प्रवासी
----------------------------
नेरूळ ते उलवे येथे रिक्षाचालकांकडून तोंडी भाडे आकारले जाते. तसेच एका रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून भाडे आकारले जाते. बऱ्याच वेळा रिक्षाचालक गणवेशदेखील घालत नाही.
- रूपाली गोरे, प्रवासी
---------------------------
नेरूळ रेल्वे स्थानकाच्या बाहेर थांबा नसल्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नेरूळ स्थानकाच्या पूर्वेला पदपथावरच रिक्षा उभ्या केल्या जातात. त्या ठिकाणी अधिकृतपणे रिक्षा थांबवण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली आहे.
- राजेश राठोड, रिक्षाचालक
--------------------------
नेरूळ पूर्वेला चौकातच फेरीवाले बसल्याने रिक्षा थांबल्यावर मोठी अडचण होते. येथील फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई केली पाहिजे. रिक्षा उभ्या करण्यासाठी आतील बाजूस रिक्षा स्टॅन्ड मिळावे, यासाठी प्रयत्न चालू आहेत.
- दिलीप आमले, अध्यक्ष, शिव वाहतूक सेना