बदलापुरात डेंगीचे रुग्‍ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलापुरात डेंगीचे रुग्‍ण
बदलापुरात डेंगीचे रुग्‍ण

बदलापुरात डेंगीचे रुग्‍ण

sakal_logo
By

बदलापूर, ता. १४ (बातमीदार) : बदलापुरात डेंगीचे रुग्ण सापडत असून, रुग्ण उपचार घेऊन घरी येईपर्यंतसुद्धा पालिकेला या संदर्भात काहीच माहिती नसल्‍याचे वास्‍तव समोर आले आहे. पालिकेचा आरोग्य विभाग शहरात आढळणाऱ्या डेंगी रुग्‍णांबाबत अनभिज्ञ असून, आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारावर सध्या प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.

बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा विभागात एकाच घरात अनुक्रमे दोन महिला व एक लहान मूल यांना डेंगीची लागण झाली आहे. या तीनही रुग्णांचा रक्ततपासणी अहवाल प्राप्त होऊन चार ते पाच दिवसांचा अवधी लोटला असून, हे रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयात डेंगीवर उपचार घेत आहेत. मात्र, शहरात साथीच्या रोगांचे रुग्ण सापडत असूनदेखील पालिकेच्या आरोग्य विभागाला मात्र या संदर्भात काहीच माहीत नसल्याचे समोर आले आहे.
दर पंधरवड्यात प्रत्येक घरी भेटी देऊन, तापाच्या रुग्णांची चौकशी करणे; तसेच साथीच्या रोगांच्या बाबतीत अहवाल पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेकडे पाठवणे. तसेच, या संदर्भात धूरफवारणी, औषध फवारणी यांसारखी उपाययोजना करण्यासंदर्भात काम करत असणाऱ्या शहरातील बहुउद्देशीय आरोग्य सेवक म्हणजे एमपीडब्ल्यू विभागानेच अद्याप आमच्याकडे या रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाला सांगितले.
------------------
तपासणी अहवाल गुलदस्‍त्‍यात
यासंदर्भात कुळगाव-बदलापूर नगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी वैशाली देशमुख यांच्याशी संपर्क केला असता, त्‍या म्‍हणाल्‍या, की जे रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून, पालिकेला या रुग्णांचे रक्ततपासणी अहवाल पाठवले जात नाहीत. त्यामुळे पालिकेला या संदर्भात लवकर माहिती उपलब्ध होत नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.