वसईतील तरुणीची दिल्लीमध्ये निर्घृणपणे हत्या; प्रियकराकडून शरीराचे ३५ तुकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police news to become police dream 22-year-old dies during training mumbai
वसईतील तरुणीची दिल्लीमध्ये निर्घृणपणे हत्या

वसईतील तरुणीची दिल्लीमध्ये निर्घृणपणे हत्या; प्रियकराकडून शरीराचे ३५ तुकडे

नालासोपारा : वसईतील तरुणीची तिच्या प्रियकराने दिल्लीमध्ये निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघड झाले आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने तरुणीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून १८ दिवसांच्या कालावधीत त्यांची दिल्लीत विविध ठिकाणी विल्हेवाट लावली. यासाठी त्याने फ्रीजही खरेदी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वसईच्या माणिकपूर आणि दिल्ली पोलिसांनी समांतर तपास करून प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास दिल्ली पोलिस करत असल्याचे वसई-माणिकपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संपतराव पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

श्रद्धा वालकर ही तरुणी पालघर जिल्ह्यातील वसई गावातील संस्कृती अपार्टमेंटमध्ये राहत होती. या ठिकाणी ती आपल्या कुटुंबासोबत राहत असताना २०१९ मध्ये मालाडमधील एका कॉल सेंटरमध्ये काम करीत होती. याच वेळी वसई, दिवाणमान येथील आफताब पुनावाला या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले होते. तिने याबाबत घरी सांगितल्यावर घरच्यांनी तिला विरोध केला; पण विरोध झिडकारून ती आफताब पुनावाला याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये वसईतील नायगाव परिसरात राहायला गेली. यानंतर जानेवारी २०२० मध्ये कोरोना काळात आईचा मृत्यू झाल्यानंतर ती वडिलांकडे राहायला आली होती. मात्र मार्च २०२२ मध्ये प्रियकरासोबत उत्तर भारत फिरायला जाते, सांगत निघून गेली होती.

मित्रामुळे पत्ता उघडकीस
श्रद्धाचा फोन मे २०२२ पासून बंद येत असल्याचे तिचा बालपणीचा मित्र लक्ष्मण नाडर याने तिच्या वडिलांना सांगितले. त्यानंतर ६ ऑक्टोबर २०२२ रोजी तिच्या वडिलांनी वसईमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण माणिकपूर पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तिचा प्रियकर मारतोय, त्रास देतोय, असे ती आपला मित्र लक्ष्मणला नेहमी सांगायची.

तांत्रिक मदतीने शोध
माणिकपूर पोलिसांनी या घटनेचा तपास करत असताना मुलीचे मोबाईल लोकेशन, बँक खाते, सोशल मीडिया खाते तपासले असता मे महिन्यापासून बंद असल्याचे समोर आले. पोलिसांनी मुलाचे लोकेशन शोधून त्याची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली; पण अधिक तपासात ही मुलगी दिल्ली येथून बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यावर माणिकपूर पोलिसांनी हे प्रकरण दिल्ली पोलिसांसह समांतर तपास केल्यावर या हत्याकांडाचा उलगडा झाला, असे माणिकपूर पोलिसांनी सांगितले.

लग्न करण्याचा तगादा
श्रद्धा आणि आफताब दिल्लीतील महरौलीमधील छतरपूर भागात एकत्र राहत होते. त्यानंतर काही दिवसांनी श्रद्धाने त्याच्या मागे लग्न करण्याचा तगादा लावला. त्यानंतर वैतागलेल्या आफताबने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. १८ मे रोजी आरोपी त्याने श्रद्धाची धारदार चाकूने हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे लहान-लहान तुकडे केले. ते तुकडे दिल्लीतील वेगवेगळ्या परिसरात टाकून दिले. आरोपी आफताबच्या चौकशीनंतर पोलिसांनी काही अवशेष जंगलातून ताब्यात घेतले. सध्या आरोपी आफताब पोलिसांच्या ताब्यात असून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.