प्रलंबित कामे मार्गी लावा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रलंबित कामे मार्गी लावा!
प्रलंबित कामे मार्गी लावा!

प्रलंबित कामे मार्गी लावा!

sakal_logo
By

पालघर, ता. १४ (बातमीदार) : सध्या राज्यात गतिमान सरकार आहे; मात्र पालघर जिल्ह्यातील कामे संथ गतीने सुरू आहेत. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या कामांना वेग कधी होणार, असा खडा सवाल आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघर जिल्ह्याच्या नियोजन समिती सभेत उपस्थित केला. यावर मागच्या सरकारचे मला माहीत नाही; पण येत्या काळात प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे तीन महिन्यांत मार्गी लावा, अशी सक्त ताकीद पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित प्रशासनातील प्रमुखांना दिल्या.

सार्वजनिक बांधकाम मंत्री, तसेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची सोमवारी (ता. १४) सभा पार पडली. या बैठकीत आक्रमक भूमिका घेत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करत प्रशासनाची लक्तरे सभागृहासमोर निदर्शनास आणून दिली. तसेच प्रशासनाचे अपयश चव्हाण यांच्यासमोर आमदार ठाकूर यांनी निदर्शनास आणले. सभेमध्ये पशुसंवर्धन विभागाला चांगलेच धारेवर धरण्यात आले. शेळीवाटप योजनेअंतर्गत दिलेल्या उद्दिष्टापैकी ५० टक्के उद्दिष्ट विभागाने पूर्ण केले नसल्याची खंत आमदार राजेश पाटील व आमदार सुनील भुसारा यांनी उपस्थित केली. त्यानंतर पालकमंत्री यांनी यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रशासनाच्या प्रतिनिधींनी असमाधानकारक उत्तरे दिल्यामुळे सभागृहामध्ये नाराजी व्यक्त केली गेली. यावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही नाराजी व्यक्त करत वारंवार हेच का सांगावे लागते, असा प्रश्न उपस्थित केला. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही, अशी तंबी दिली. आमदार सर्वश्री श्रीनिवास वनगा, विनोद निकोले, शांताराम मोरे, खासदार राजेंद्र गावित यांनी विविध विषयांना वाचा फोडत त्या पालकमंत्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण, आमदार निरंजन डावखरे, आमदार बाळाराम पाटील, तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रशासनाचे प्रमुख अधिकारी या सभेला उपस्थित होते.

प्रश्नांची री ओढण्याचा प्रयत्न
एकंदरीत जिल्हा विकास, विकासकामांचा निधी, विविध जनसुविधीची कामे व योजना यासंदर्भात ऊहापोह झाला असला, तरी पालकमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची री ओढत ही सभा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. ठेकेदाराच्या मर्जीनुसार कामे करू नका; तर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन, त्यांना उद्घाटनासाठी निमंत्रण देऊन ही कामे करा, असे सांगण्यात आले.

गैरव्यवहाराविषयी ताशेरे
आमदार शांताराम मोरे यांनी या सभेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गैरव्यवहाराविषयी ताशेरे ओढले. त्या वेळी स्वतः सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असलेले व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी या प्रश्नावर शांत राहणे पसंत केले.