आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा
आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा

आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १४ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कळवा- मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर अवघ्या ७२ तासांमध्ये दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी (ता. १३) मुंब्रा वाय जंक्शन उड्डणपुलाच्या उद्‍घाटनावेळी आपला विनयभंग झाल्याची तक्रार भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने दिल्यानंतर आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतापलेल्या आव्हाड यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे ट्विट करताच राजकारण तापले. ठाणे, मुंब्य्रात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले; तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही ठाण्यात धाव घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी कळवा खाडी पूल आणि मुंब्रा येथील वाय जंक्शन उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले. ही दोन्ही विकासकामे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघातील असल्याने ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्य्रानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा डोंबिवलीच्या दिशेने रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित भाजपच्या महिला पदाधिकारी रिदा रशीद यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्या समोरून येत असताना गर्दीतून वाट मोकळी करत आव्हाड तेथून पुढे जात होते. त्याच दरम्यान आमदार आव्हाड यांनी त्या महिलेला हाताने बाजूला करून ते निघून गेले; पण आव्हाड यांनी जाणीवपूर्वक खांद्याला धरून ‘चल बाजूला हो’, असे म्हणत आपल्याला ढकलल्याचा आरोप केला आहे.

याप्रकरणी रिदा रशीद यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात आव्हाड यांच्याविरोधात रविवारी रात्री उशिरा विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर न्यायालयाने मुंब्रा पोलिसांना म्हणणे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

भीती खरी ठरली?
तीनच दिवसांपूर्वी ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध दर्शवत जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याच्या विवियाना मॉल येथील शो बंद पाडला होता. या वेळी झालेल्या राड्यात एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा गुन्हा वर्तकनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शुक्रवारी त्यांना अटक झाल्यानंतर शनिवारीच जामीन मिळाला होता; मात्र आपल्यावर पुन्हा पोलिस कारवाई होऊ शकते, अशी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलेली भीती अखेर खरी ठरली आहे.

...तर रोज शेकडो विनयभंग
विनयभंगचा गुन्हा दाखल होताच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. आपणाविरुद्ध पोलिस अत्याचार सुरू असल्याचा दावा करत, दुसरा खोटा गुन्हा दाखल केल्याचे ते म्हणाले. इतकेच नव्हे, तर ट्विट करून अंगावर धडकणाऱ्‍या व्यक्तीला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेनमध्ये, रेल्वे पुलावर गर्दीमध्ये रोज शेकडोंनी विनयभंग होत असतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

माझ्या हातात ताकद आहे, त्याचा वापर करू, अशी आमदार जितेंद्र आव्हाड यांची मानसिकता झाली आहे. म्हणूनच मध्ये येणाऱ्याला ते बाजूला उचलून फेकून देत आहेत; पण जे माझ्यासोबत झाले, ते दुसऱ्‍या महिलेसोबत होऊ नये.
- रिदा रशीद, फिर्यादी