ठाणे, मुंब्य्रात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे, मुंब्य्रात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
ठाणे, मुंब्य्रात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

ठाणे, मुंब्य्रात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १४ : भाजपच्या महिला पदाधिकाऱ्या‍च्या तक्रारीवरून आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगचा गुन्हा पोलिसांनी दाखल केल्यानंतर ठाणे, मुंब्य्रात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. सोमवारी सकाळी मुंब्रा पोलिस ठाण्याबाहेर घोषणाबाजी, ठिय्या आंदोलन करून कार्यकर्त्यांनी विवियाना मॉल तसेच बायपास मार्ग, ठाणे-पुणे महामार्गावर जळलेले टायर टाकून वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न केला. आव्हाड समर्थकांनी दुकाने, रिक्षा बंद केल्यामुळे नागरिकांचीही गैरसोय झाली. विशेषतः कामावर जाणाऱ्या नागरिकांना पायपीट करत स्थानक गाठावे लागले. दरम्यान वातावरण तणावपूर्ण झाल्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवत राज्य राखीव दलाच्या तुकड्यांना पाचारण केले.

आमदार डॉ. आव्हाड यांच्यावर कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच, त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड पतीच्या बचावासाठी मैदानात उतरल्या. आव्हाड यांच्या आमदारकीचा बळी देण्यासाठीच हे सर्व कारस्थान रचले जात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचेच माजी नगरसेवक राजन किणे यांचे नाव घेत त्यांच्या महत्त्वाकांक्षेचा पर्दाफाश केला. तसेच आव्हाड यांच्यावर लावण्यात आलेल्या गुन्ह्यांविरोधात आवाज उठवणार असून, त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाही तर आम्ही पोलिसांविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान आव्हाड यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतल्याबाबत ऋता आव्हाड यांना विचारणा केली असता, त्यांनी हात उंचावून उलट कार्यकर्त्यांनाच प्रश्न केला. यावेळी त्यांच्या समर्थकांकडून ‘नाही’ असे उत्तर आले.

‘तो व्हिडीओ शहरभर दाखवणार’
गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे होणारे स्पर्श विनयभंग आहे का? असेल तर अशा ठिकाणी जायचेच कशाला असा प्रश्न ऋता आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर नेमके काय घडले, हे जनतेला कळायला हवे म्हणून भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने सादर केलेला व्हिडीओ आपण स्वतः मोठे स्क्रीन लावून शहरभर दाखवणार असल्याचे त्या म्हणाल्या. त्यानंतर ऋता आव्हाड यांनी संबंधित भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

छट पूजेमधील वादाची किनार...
विनयभंगाची तक्रार दाखल करणाऱ्या‍ ‘त्या’ महिलेचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. छटपूजेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच आमदार आव्हाड यांच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल केलेल्या भाजपच्या त्या महिला पदाधिकाऱ्या‍वर २६ ऑक्टोबरला एका दलित कार्यकर्त्याला मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी रोखल्याने ॲट्रॉसिटीचा गुन्हा मुंब्रा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. त्याचाच राग मनात धरून खोट्या गुन्ह्यात आमदार आव्हाड यांना गोवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे. या वादाला छट पूजेच्या भांडणाचे कारण असल्याची चर्चाही राष्ट्रवादीमध्ये असल्याचे बोलले जाते.