
धारावीतील सोमवार बाजार विरोधात मनसेचे आंदोलन
धारावी, ता. १५ (बातमीदार) : धारावीत दर सोमवारी दुकाने बंद ठेवण्यात येतात. याचाच फायदा घेत धारावी मुख्य रस्त्यावर दर सोमवारी किरकोळ साहित्य विक्रीचा बाजार बसतो. ज्यास धारावीत ‘सोमवार बाजार’ म्हणून ओळखले जाते. हा बाजार बंद केला जावा, अशी मागणी करत आज (ता. १४) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.
मनसेने केलेल्या आरोपानुसार दर सोमवारी भरत असलेल्या या बेकायदा बाजारामुळे वाहतूक कोंडी होते. तसेच या ठिकाणी महिला व मुलींची छेड काढणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तसेच पदाचाऱ्यांचा गर्दीत चुकून धक्का लागला तर फेरीवाले व त्यांचे समर्थक दादागिरी करून शिवीगाळ करतात, यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. त्याला वाचा फोडण्यासाठी मनसेचे धारावी विधानसभा क्षेत्राचे उपविभाग अध्यक्ष कौशिक कोळी यांच्या नेतृत्वाखाली व मनसेचे विधानसभा विभाग अध्यक्ष राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता; तर पालिकेने फेरीवाले रस्त्यावर बसणार नाहीत याची दक्षता घेतली होती.