विनाकारण चैन खेचल्याप्रकरणी २४१ गुन्हे दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनाकारण चैन खेचल्याप्रकरणी २४१ गुन्हे दाखल
विनाकारण चैन खेचल्याप्रकरणी २४१ गुन्हे दाखल

विनाकारण चैन खेचल्याप्रकरणी २४१ गुन्हे दाखल

sakal_logo
By

ठाणे, ता. १५ (वार्ताहर) : लोकल किंवा लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वे गाड्यांची अलार्म चेन खेचून गाडी थांबवण्याच्या प्रवृत्तीत वाढ झालेली आहे. सुरक्षा बल पथकाने अशा प्रकारे अलार्म चेन खेचणाऱ्या २४१ लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे, अशी माहिती ठाणे रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप भानू सिंग यांनी दिली.
रेल्वेच्या उपनगरीय आणि मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत गाडी थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक पर्याय अलार्म चेन उपलब्ध करून दिलेला आहे. या आपत्कालीन परिस्थितीत वापरात आणण्याच्या सुविधेचा गैरवापर करीत असल्याचे समोर आले आहे. उत्तरपूर्व भागातून येणाऱ्या किंवा जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेसमध्येही प्रवृत्ती बळावल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. जानेवारी २०२२ ते आक्टोबर २०२२ या कालावधीत ठाणे रेल्वे सुरक्षा बलाच्या हद्दीत घडलेल्या २४१ अलार्म चेन खेचण्याच्या घटनांप्रकरणी गुन्हे दाखल करीत दंडात्मक वसुली केली आहे.
................................
शिक्षा आणि दंडाची तरतूद
आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिलेली अलार्म चेनचा गैरवापर केल्यास रेल्वे अधिनियम १९८९ च्या कलम १४१ नुसार शिक्षा होऊ शकते. विनाकारण चेन खेचणाऱ्या व्यक्तीविरोधात एक हजार रुपयांचा दंड आणि एक वर्षाचा कारावास किंवा चेन खेचण्याच्या गंभीरतेवर यानुसार कदाचित दोन्ही शिक्षांची अंमलबजावणी होऊ शकते, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप भानू सिंग यांनी दिली.
.................................
प्रवृत्ती बळावल्याने रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडते
कुठलेही पूरक कारण किंवा आपत्कालीन परिस्थिती नसताना केवळ सुविधेसाठी चेन खेचणाऱ्यांमुळे रेल्वे गाड्या थांबल्यानंतर किमान मागच्या गाड्या १५ मिनिटे उशिरा धावतात. याचा त्रास अन्य प्रवाशांना होतो. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारे चेन खेचल्यास उपनगरीय गाड्याही काही मिनटे का होईना उशिरा धावतात. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यावर रेल्वे सुरक्षा बल करडी नजर ठेवून असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

.........................
अशा प्रसंगी अलार्म चेन खेचणे योग्य
* धावत्या रेल्वे गाडीत आग लागल्यास चेन खेचावी
* ट्रेन सुटण्याची शक्यता असताना वयोवृद्धाला ट्रेनमध्ये चढण्यास त्रास होत असल्यास
* जर प्रवाशांची लहान मुले स्टेशनवर राहिल्यास आणि ट्रेन सुरू झाल्यास चेन खेचावी
* प्रवासात वयोवृद्ध किंवा व्यक्तीची प्रकृती अचानक गंभीर झाल्यास उपचारासाठी चेन खेचावी
* धावत्या ट्रेनमध्ये चोरी किंवा दरोडा पडलेला असल्यास चेनच्या सुविधेचा वापर करावा


ट्रेनमध्ये अलार्म चेन ही आपत्कालीन सुविधा आहे. योग्य कारणास्तव तिचा वापर केल्यास प्रवाशाला सुरक्षा उपलब्ध होते, समस्या सुटते; मात्र केवळ व्यक्तिगत सुविधेसाठी चेनचा वापर केल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होतो. अशा प्रकरणात रेल्वे सुरक्षा बल कठोर कारवाई करते. गुन्हा दाखल करणयाबरोबरच दंडात्मक कारवाई करण्यात येते. रेल्वेने दिलेल्या सुविधेचा योग्य वापर करा; अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
- प्रताप भानू सिंग, व.पो.नि. रेल्वे सुरक्षा बल, ठाणे