कामोठे, कळंबोली, खारघरमध्ये उग्र वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामोठे, कळंबोली, खारघरमध्ये उग्र वास
कामोठे, कळंबोली, खारघरमध्ये उग्र वास

कामोठे, कळंबोली, खारघरमध्ये उग्र वास

sakal_logo
By

कामोठे, ता. १५ (बातमीदार) : वायू, जल प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे कामोठे, कळंबोली, खारघर विभागात रात्रीच्या वेळी उग्र वास येत आहे. लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना डोळे जळजळणे, श्वसनाचा त्रास सुरू आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषणकारी कारखान्यांविरोधात कडक कारवाई करत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कामोठेतील सामाजिक कार्यकर्ते अमोल शितोळे यांनी प्रदूषणाविरोधात पंतप्रधान कार्यालयाकडे लेखी तक्रार केली आहे.
तळोजा औद्यगिक वसाहतीमधील काही रासायनिक कारखाने दूषित पाण्यावर प्रक्रिया न करता कासाडी नदीत सोडत आहेत. हे दूषित पाणी पुढे खारघर, कामोठे, कळंबोली शहरालगत असलेल्या खाडीत मिसळत आहे. त्यामुळे जलप्रदूषण वाढले आहे. तसेच कारखान्यांच्या धुरांड्यातून हवेत सोडण्यात येणाऱ्या धुरामुळे वायुप्रदूषणात वाढ झाली आहे. या विरोधात नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. परंतु, प्रशासनाने उचित कार्यवाही केली नसल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे.
कामोठ्यामध्ये रात्री ८ नंतर उग्र वास येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना डोळे जळजळणे, श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे. गरोदर मातांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत आहे. खारघर ते मानसरोवर रेल्वे स्थानक दरम्यान प्रवाशांना नाकावर रुमाल ठेवण्याची वेळ आली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत शितोळे यांनी सोमवारी (ता. १४) पंतप्रधान कार्यालयाला ई-मेलद्वारे तक्रार दिली असून प्रदूषण रोखण्याची विनंती केली आहे.

अनेक दिवसांपासून रोज रात्री प्रदूषणाच्या त्रासामुळे नागरिकांना घराच्या दारे-खिडक्या बंद करून बसावे लागत आहे. स्थानिक पातळीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून प्रदूषणाची समस्या सोडवली जाईल असा विश्वास आहे.
- अमोल शितोळे, सामाजिक कार्यकर्ते, कामोठे