अंबरनाथचे नेहरू उद्यान होणार अद्ययावत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथचे नेहरू उद्यान होणार अद्ययावत
अंबरनाथचे नेहरू उद्यान होणार अद्ययावत

अंबरनाथचे नेहरू उद्यान होणार अद्ययावत

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १६ (बातमीदार) : गेल्या सुमारे ५० वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या अंबरनाथमधील पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाच्या दुरुस्ती आणि डागडुजीला मुहूर्त सापडला असून सुमारे साडेसात कोटी रुपये खर्च करून उद्यान अद्ययावत करण्यात येणार आहे.
शहराच्या पूर्वेकडे आणि रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या कानसई भागात १९७२ मध्ये पंडित नेहरू यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. एवढी वर्षे उलटूनही नेहरूंच्या पुतळ्याचे अनावरण होऊ शकलेले नाही. नगरपालिका, कल्याण महापालिका आणि पुन्हा अंबरनाथ नगरपालिकेच्या ताब्यातील उद्यानात त्याकाळी लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी होती. बागेत नागरिकांना बसायला बाक, लहान मुलांसाठी मिनी ट्रेन अशा सुविधा उपलब्ध होत्या. नंतर या उद्यानाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. खेळण्यांचे नुकसान होऊन मिनी ट्रेनचे डबे एका खोलीत बंदिस्त झाले होते.
उद्यानाच्या दुरवस्थेकडे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे लक्ष वेधण्‍यात आल्‍यानंतर, तत्काळ त्यांनी उद्यान अद्ययावत करण्यासाठी विशेष अनुदानातून साडेपाच कोटी खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यास प्रशासनाला सांगितले होते. या प्रस्तावानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी साडेपाच कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. सोमवारी बालदिनाच्या मुहूर्तावर पालिकेने उद्यानात करण्‍यात येणार असलेल्या विविध कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच उद्यानाच्या कामाला गती मिळेल, असा विश्वास मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी व्यक्त केला.
लहान मुलांसाठी विविध सेवा
सुमारे ५,९४८.८७ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, योगा आणि व्यायामाचे क्षेत्र, अभ्यासिका, थीम गार्डन, विविध प्रकारची शिल्पचित्रे, स्केटिंगची सुविधा, नेहरूंच्या पुतळ्याचे सुशोभीकरण, कारंजे, जांभा दगडाचा वापर करून पथमार्ग, जॉगिंग ट्रॅक, पुरेसा विद्युत आणि पाणीपुरवठा या कामांचा अंतर्भाव आहे. उद्यानात अस्तित्वात असलेल्या अनेक झाडांपैकी एकाही झाडाला धक्का न लावता उद्यान अद्ययावत करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.