रिक्षा अन् फेरीवाल्यांमुळे रस्ता गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षा अन् फेरीवाल्यांमुळे रस्ता गायब
रिक्षा अन् फेरीवाल्यांमुळे रस्ता गायब

रिक्षा अन् फेरीवाल्यांमुळे रस्ता गायब

sakal_logo
By

बदलापूर, ता. १६ (बातमीदार) : बदलापूर पश्चिम मुख्य बाजारपेठेत वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. एका बाजूला शेअर रिक्षा रांगेत उभ्या असतात; तर दुसऱ्या बाजूला अनेक फेरीवाल्यांनी अगदी रस्त्यावरच आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना गाडी चालवायला रस्ताच सापडेना, अशी स्थिती शहरात पाहायला मिळत आहे.
बदलापूर शहरात पश्चिम भागात मुख्य बाजारपेठेतील रस्ता शोधून सापडला तर नवलच अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. पालिकेच्या डोळ्यांदेखत संपूर्ण बाजारपेठेत अनधिकृत फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. पश्चिमेस छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई तसेच स्वर्गीय आनंद दिघे भाजी मंडई असतानाही मुख्य रस्त्याच्या एका बाजूला अनधिकृत फेरीवाल्यांनी विळखा घातला आहे. त्यात दुसऱ्या बाजूला स्कायवॉक व सध्या सुरू असलेल्या होम प्लॅटफॉर्मच्या कामामुळे अरुंद झालेल्या जागेत शहरात चालणाऱ्या प्रवासी रिक्षांच्या रांगा असतात. त्यामुळे मुख्य रस्ता यात कुठे तरी गडप झाला आहे.
या सगळ्या अडचणींमुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

.........................
पालिकेचे दुर्लक्ष
सकाळी, सायंकाळी गर्दीच्या वेळी तसेच, एस. टी बस, शाळेच्या बस, मोठी अवजड वाहने चालवत असताना तर या ठिकाणी मोठी वाहतूककोंडी होते. या वेळी रुग्णांना नेणारी एखादी रुग्णवाहिका या रस्त्यातून जाणार असेल, तर मोठी समस्या उद्भवते. या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा पालिका प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करत असून या अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिका का कारवाई करत नाही, असे प्रश्न सध्या डोके वर काढत आहेत.

.........................
पश्चिमेस बाजारपेठ उपलब्ध असूनसुद्धा अनेक अनधिकृत फेरीवाले रस्त्यावर येऊन बसत आहेत. त्यांनी मागणी केली तर त्यांना आम्ही काही तरी व्यवस्था करून देऊ; मात्र सध्या त्यांच्या दुकानांमुळे वाहनचालकांना होत असलेला त्रास पाहता लवकरच पालिका या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करेल.
- योगेश गोडसे, मुख्याधिकारी कु. बदलापूर नगरपालिका