मिरा-भाईंदर महापालिकेत मेगा भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा-भाईंदर महापालिकेत मेगा भरती
मिरा-भाईंदर महापालिकेत मेगा भरती

मिरा-भाईंदर महापालिकेत मेगा भरती

sakal_logo
By

भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेली पदे भरण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. आकृतिबंधातील रिक्त असलेली पदे पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत भरण्याच्या सूचना राज्य सरकारने सर्वच महापालिकांना केल्या आहेत. त्यानुसार ही कार्यवाही केली जाणार आहे.
महापालिकेच्या विविध विभागातील पदांच्या आकृतिबंधाला राज्य सरकारने २०१९ मध्ये मान्यता दिली आहे. या आकृतिबंधानुसार महापालिकेत एकंदर १५४७ पदे मंजूर आहेत. पण यापैकी केवळ ८५२ पदेच भरण्यात आली असून ६९५ पदे रिक्तच आहेत. यात शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, शिक्षण अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता या महत्त्वाच्या पदांसह लिपिक, वाहनचालक, अग्निशमन कर्मचारी अशी वर्ग एक ते वर्ग चारमधील अनेक पदे रिक्तच आहेत.
आतापर्यंत महापालिका आस्थापनाचा खर्च निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे पदे भरणे प्रशासनाला शक्य झाले नव्हते. पदांची भरती करण्यासाठी आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या खाली असणे आवश्यक आहे. परंतु महापालिकेचा आस्थापनावर होणारा खर्च ४५ टक्क्यांहून अधिक असल्याचे दिसून येत असल्याने भरती प्रक्रिया झाली नव्हती. परिणामी २०१६ मध्ये आरोग्य विभागात झालेल्या अत्यावश्यक पदांच्या भरतीशिवाय गेल्या काही वर्षात महापालिकेचे एकही स्थायी पद भरण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्‍यांची भरती करण्यात आली आहे. एवढेच नाही तर सार्वजनिक बांधकाम व अतिक्रमण विरोधी विभागात लागणारे कनिष्ठ अभियंता देखील कंत्राटीच पद्धतीने घेण्यात आले आहेत. कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेले अभियंता अथवा अन्य कर्मचारी यांच्यावर कोणत्याही कामाची जबाबदारी निश्चित करणे शक्य होत नाही. तसेच एखाद्या चुकीच्या कामाबद्दलही त्यांच्यावर ठोस कारवाई होऊ शकत नाही. त्यामुळे रिक्त असलेल्या जागी स्थायी कर्मचाऱ्‍यांची भरती करणे आवश्यक झाले आहे.

कार्यवाहीसाठी संस्थेची नियुक्ती
प्रशासनाने आस्थापनेवरील खर्च ३५ टक्क्यांच्या खाली आणला आहे. त्यामुळे रिक्त पदांची भरती करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. पदे भरण्याच्या प्रस्तावाला आयुक्तांकडून मान्यता मिळाल्यानंतर पदे भरण्याची कार्यवाही करण्यासाठी शासनमान्य संस्थेची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली.